भाजप वगळता अन्य विरोधी पक्षांची उदासिनता; विधानसभेच्या मतदार याद्या पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 03:09 PM2017-11-08T15:09:41+5:302017-11-08T15:09:50+5:30
नाशिक : लोकसभेच्या निवडणूक दिड वर्षावर तर विधानसभेची निवडणूक दोन वर्षावर येवून ठेपल्याने त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपासह सर्वच विरोधी पक्षांनी आत्तापासूनच ताबूत गरम करण्यास सुरूवात केलेली असतांना प्रत्यक्षात ज्या मतदारांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली जाते त्या मतदारांची नावे असलेल्या मतदार याद्यांकडे मात्र भाजप वगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांनी साफ दुर्लक्ष केले आहे. आॅक्टोंबर महिन्यात निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या निवडणूक शाखेकडून घेऊन जाण्यास या पक्षांना अद्याप वेळ मिळालेला नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने चालू वर्षी जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मतदार पुर्नरिक्षण मोहिम राबवली. विधानसभा मतदार संघ निहाय मतदार याद्या अद्यावत करतानाच नवीन मतदारांची नोंदणीही या काळात करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात हजारो नवीन मतदारांची नोंदणी या काळात करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या या मतदार पुर्नरिक्षण मोहिमेत नाव नोंदणी करणाºया सर्वच मतदारांची छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ३ आॅक्टोेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार विधानसभेच्या मतदार याद्या त्या त्या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना अवलोकनार्थ मोफत दिली जाते. नाशिक जिल्ह्यातील भाजप, शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाकपा, माकपा, बसपा व महाराष्ट्र नव निर्माण सेना या आठ पक्षांसाठी जिल्हा निवडणूक शाखेने पंधराही विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या राखीव ठेवल्या असून, प्रारूप यादी प्रसिद्ध होताच या सर्व राजकीय पक्षांना लेखी पत्राद्वारे मतदार याद्या घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली. या विनंतीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यानंतर त्यांना पुन्हा स्मरणपत्रे देण्यात आली व त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दोन आठवड्यापुर्वी झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीतही निवडणूक शाखेने प्रत्यक्ष राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदार याद्या घेऊन जाण्याची गळ घातली. परंतु राजकारण करण्यात मश्गुल असलेल्या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना त्यासाठी वेळ मिळालेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून काही दिवसांपुर्वीच याद्या ताब्यात घेण्यात आल्या मात्र अन्य राजकीय पक्षांना या मतदार याद्यांशी अद्याप तरी काही देणे-घेणे दिसलेले नाही. सध्या जिल्हा निवडणूक शाखेत या याद्या पडून आहेत. एकीकडे आगामी निवडणुकांची तयारी केली जात असताना दुसरीकडे ज्या मतदारांच्या भरवशावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार त्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.