नदीपात्रातून बेसुमार वाळूचा उपसा
By admin | Published: June 4, 2016 09:57 PM2016-06-04T21:57:09+5:302016-06-05T00:09:35+5:30
गिरणा : वाहनांची गर्दी वाढल्याने जत्रेचे स्वरूप; जिवीत, वित्तहानीचा धोका कायम
लोहोणेर : येथील गिरणा नदीपात्रातून दररोज बेसुमार वाळूचा उपसा होत असून, यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असल्याने पाण्याची पातळी चांगलीच खालावत चालली असली तरी या वाळू उपशाने मात्र चांगलाच जोर धरला असून, स्थानिक वाहनांबरोबर बाहेरील वाहने वाढल्याने येथे दररोज रात्री नदीपात्रात
मोठी यात्रा भरते. यामुळे गिरणापात्रात जत्रा ट्रॅक्टर सतराऐवजी सत्तावन्न
अशी म्हणण्याची वेळ आली
असून, या जत्रेला अभय कोणाचे, असा प्रश्न आता उभा राहिला
आहे.
गिरणा नदीपात्रातून दररोज बेसुमार वाळू उपसा होतो, हे सर्वश्रुत आहे. सायंकाळी ८ वाजेनंतर या जत्रेला सुरुवात होते. ती १२ तास सकाळी ८ वाजेपर्यंत चालू असते. तर पहाटे ६ वाजेपासून पुन्हा बैलगाडीच्या जत्रेला खऱ्याअर्थाने सुरुवात होते. या जत्रेला या वाळू तस्कराचा स्वत:चा असा खास बंदोबस्त असतो. त्यासाठी ते रात्रीचा-दिवस करीत असतात. त्यासाठी ते वेळप्रसंगी गस्तीसाठी येणाऱ्यानांही पहाटे ४ वाजेपर्यंत नदीपात्रात उभे करतात. तेही धंदा व्यवस्थित होत असल्याने इमानेएतबारे आपली हजेरी लावतात. या जत्रेला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या जत्रेचे दरही चांगलेच वाढले आहेत.
ट्रॅक्टर सापडलेच तर आपले वाली लोकप्रतिनिधींना फोन करायला हजर असतात. त्यामुळे यांची दुकानदारी व्यवस्थित चालू आहे. या भाऊगर्दीत एखाद्या नवख्याने ट्रॅक्टर टाकलेच तर ही मंडळी फोन करून साहेबांना सांगतात. गिरणा नदीपात्रात लोहोणेर, ठेंगोडा, आराई , खमताने, सटाणा, देवळा, वासोळ, पिंपळगाव, वाखारी, खालप, दहीवड आदि गावांतून सुसाट वेगाने ट्रॅक्टर येतात. याच नादात काल रात्री वासोळ येथील एक ट्रॅक्टर चक्क लोहोणेर गावाजवळील खाटकी नाल्यात रात्री साडेअकराच्या सुमारास हूक तुटल्याने कोसळले.
या अपघातात ट्रॅक्टरचे ही नुकसान झाले. तर ट्रॅक्टरवरील कोणाचे हात मोडले, कोणाच्या डोक्याला लागले. याची कुठे वच्चता होऊ नये म्हणून सदर ट्रॅक्टर रात्रीच सोयिस्कर ठिकाणी लपविण्यात आला. तर जखमींना रात्रीच दवाखान्यात हलविण्यात आले. ट्रॅक्टर जरी लंपास केला तरी जागेवर ट्रॉली सोडून जाण्याची वेळ या वाळू तस्करांवर आल्याने याची व्हायची तेवढी वाच्यता सगळीकडे झाली. (वार्ताहर)