एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

By admin | Published: January 14, 2016 10:30 PM2016-01-14T22:30:48+5:302016-01-14T22:50:00+5:30

येवला : साठवण तलावात केवळ ३० दलघफू पाणी; शहराला यापुढे पाच दिवसाआड पाणीपुरवठा

Excess stock up till April-end | एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

Next

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ ३० दलघफू पाणी आले. सध्या पालखेडचे पाणी मनमाड शहर व रेल्वेसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा तलावाकडे वळविण्यात आले आहे. ५० दलघफू क्षमता असलेल्या येवला शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान ४५ दलघफू पाणी भरले जावे, अशी अपेक्षा होती व तसे पालिकेचे नियोजनही होते. तरच पाच दिवसाआड पाणी देऊन एप्रिल-अखेरपर्यंत येवलेकरांची तहान भागली जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात पुन्हा येवल्याला पाणी मिळणार असल्याची भाबडी अशा पालिका बाळगून असली तरी, आता पाणी मिळणार नसल्याची माहिती आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आवर्तनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत किमान ४५ दलघफू पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. कदाचित केवळ ३२ दलघफू पाणीसाठ्यावर समाधान मानले तर मार्चअखेरच अवघ्या तीन महिन्यांनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे स्पष्ट संकेत आजच स्पष्ट झाले आहेत. हतबल झालेल्या पालखेड प्रशासनाला येवला पालिका प्रशासनाने स्वत: अधिक लक्ष घालून मदत केल्याने किमान ३० दलघफू पाणीसाठा तरी उपलब्ध झाला. कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनधिकृत उपसा, पालखेड कालव्याचे प्रशासन, पोलीस या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे येवल्याला तब्बल चार दिवस उशिरा पाणी पोहोचले. नवीन साठवण तलावालगत ५०० मीटरपर्यंत १०९ विहिरी कागदावर असल्या तरी पुन्हा सर्वेक्षण करून नेमक्या विहिरी किती याची आकडेवारी निश्चित करून त्यांच्या होणाऱ्या अमर्याद उपशाबाबत कायदेशीर कृतियुक्त बंधने आणावी लागतील. तलावालगतच्या खासगी विहिरीतून पाणी विकले जाते यावरदेखील टाच आणावी लागेल. पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला व दरडोई १०० लिटर पाणी दिले तरी महिन्याला पाच दलघफू पाणी खर्ची पडते. या आकडेवारीवरून सध्या साठवण तलावात भरलेले ३० दलघफू पाणी सहा महिने पुरायला हवे; परंतु चार महिनेदेखील पुरत नाही.(वार्ताहर)

Web Title: Excess stock up till April-end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.