समृद्धीच्या ठेकेदाराकडून नियमापेक्षा जादा खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:20+5:302021-05-30T04:12:20+5:30
शासकीय नियमाप्रमाणे ६ मीटरपर्यंत खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५० फुटांहून अधिक खोदकाम करण्यात आले आहे. ...
शासकीय नियमाप्रमाणे ६ मीटरपर्यंत खोदकाम करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५० फुटांहून अधिक खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळी खालावल्यास १८-२० विहिरींना फटका बसणार असून, शेती धोक्यात येणार असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. वावी-माळवाडी आणि घोटेवाडी या तीन गावांच्या शिवारात असलेल्या वावीच्या गट नंबर १००५ मधून समृद्धीच्या ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. सदर ठेकेदाराने तब्बल ५० फुटांपर्यंत खोदकाम केल्याने पाणी पातळी खालावण्याची भीती निर्माण झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास परिसरातील कैलास गुंजाळ, भारत यादव, महेंद्र बच्छाव, अभिजित बच्छाव, विकास बच्छाव, संतोष यादव, प्रकाश यादव, तुषार यादव, तुकाराम गवळी, भाऊसाहेब भगत, सुभाष थोरात, गणेश थोरात, बाळू यादव, शेखर गुंजाळ आदी शेतकऱ्यांनी या कामावर जात खोदकाम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, समृद्धीच्या ठेकेदाराने वावी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गाने यासंदर्भात आवाज उठविण्याचा सल्ला दिला. कोते यांच्या सूचनेवरून शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेत तहसीलदारांकडे यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे सांगितले. गेल्या १८ महिन्यांपासून गट नंबर १००५ मधील १० एकर क्षेत्रात प्रमाणापेक्षा अधिक खोदकाम केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
फोटो - २९ वावी समृद्धी
सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात समृद्धी महामार्गासाठी अशा पद्धतीने खोदकाम करून गौण खनिजाचा उपसा केला जात आहे.
===Photopath===
290521\29nsk_4_29052021_13.jpg
===Caption===
फोटो - २९ वावी समृद्धी सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात समृद्धी महामार्गासाठी अशा पद्धतीने खोदकाम करून गौण खनिजाचा उपसा केला जात आहे.