सिन्नर- शिर्डी महामार्गाच्या कामासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:14 PM2020-12-18T16:14:13+5:302020-12-18T16:15:37+5:30
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या कामासाठी दगड व मुरुम उपसण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विहिरींपेक्षा खोल खाणी खोदण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी आटून या खाणीत जाऊ लागल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली करून उपसा केला जात असल्याने त्यावर वचक ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गाचे काम सध्या झपाट्याने सुरू असून, या कामासाठी परिसरातील मुरूम, माती, दगड काढण्याचे काम सुरू आहे. असाच काही प्रकार पिंपरवाडी शिवारातील गट क्रमांक ११८ व त्यालगत असणाऱ्या अनेक गटांमध्ये खोदकाम सुरू आहे. मात्र खोदकाम करताना संबंधित ठेकेदाराने प्रमाणापेक्षा जास्त खोदकाम पिंपरवाडी शिवारात केले आहे. परिणामी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी या खोल केलेल्या खाणीत उतरले आहे. संबंधित ठेकेदाराला खोदकामाची मर्यादा ठरवून दिलेली असूनदेखील त्याने ७० फूट खोल खोदकाम केल्याचे पिंपरवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर शेतकऱ्यांची विहिरींची मर्यादा अवघ्या ५० फुटाची आहे. मात्र या ठेकेदाराने यापेक्षा जास्त खोदकाम केले. त्यामुळे परिसरातील बऱ्याच विहिरींचे पाणी आटल्याचा परिणाम जाणवत आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये तशा तक्रारी केल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासन कुठलीही ठोस भूमिका याबाबत घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या घरावर नांगर फिरतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. प्रमाणापेक्षा जास्त झालेले खोदकाम तत्काळ थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा सिन्नर- शिर्डी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा पिंपरवाडी येथील हरिभाऊ कापसे, रतन हाडोळे, मंगेश काकड, सुधाकर काकड, दत्तात्रय शिंदे, शंकर शिंदे, भिका कापसे, किरण शिंदे, बबन हाडोळे, योगेश हाडोळे, रवींद्र गुरुळे, बाबासाहेब हाडोळे, नानासाहेब हाडोळे, रघुनाथ शिंदे, दत्तात्रेय काकड, अशोक पवार, वैभव कापसे आदी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.