एटीएम कार्डची अदलाबदल करुन सव्वा लाख हडपले
By admin | Published: April 7, 2017 01:28 AM2017-04-07T01:28:25+5:302017-04-07T01:28:37+5:30
सिन्नर : दोघा भामट्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून १ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला.
सिन्नर : एटीएममधून पैसे काढल्याची स्लिप निघत नसल्याने आपण स्लिप काढून देतो, असा बहाणा करुन दोघा भामट्यांनी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून या ग्राहकाच्या खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे महाराष्ट्र बॅँकेचे एटीएम आहे. मूळ संगमनेर तालुक्यातील रहीमपूर येथील रहिवाशी असलेले व हल्ली नोकरीनिमित्त वावीच्या गणेशनगर भागात राहणारे रमेश दादासाहेब वाळूंज हे सोमवारी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र बॅँकेच्या एटीएममध्ये आले होते. एटीएम मधून पैसे काढल्यानंतर पैसे काढल्याची स्लीप बाहेर आली नाही.
यावेळी त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दोघा अनोळखी युवकांनी पाठीमागे थांबून एटीएमचा पिनकोड गुपचूप पाहून घेतला. त्यानंतर या दोघा युवकांनी एटीएममधून स्लीप काढून देतो असे सांगत वाळूंज यांचे एटीएम आपल्या ताब्यात घेतले. हातचलाखी करत या दोघांनी वाळूंज यांच्या हातात सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाचे दुसरे एटीएम दिले. त्यानंतर हे दोघे पसार
झाले.
त्यानंतर या दोघा भामट्यांनी मंगळवारी व बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणावरुन वाळूंज यांच्या सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या खात्यातून १ लाख १९ हजार रुपये काढून घेतले. मंगळवारी बॅँकेला सुट्टी होती. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत या दोघा भामट्यांनी एटीएममधून पैसे काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाळूंज यांनी बुधवारी वावी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मुख्तार सय्यद अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)