बिटकोत बेडसाठी पैशांची देवाणघेवाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:13+5:302021-04-18T04:13:13+5:30
शहरातील सर्वात मोठे असलेले बिटको कोविड सेंटर हे करोना बाधितांसाठी वरदान ठरले आहे. त्याठिकाणी कुठलेही पैसे न घेता रुग्णांना ...
शहरातील सर्वात मोठे असलेले बिटको कोविड सेंटर हे करोना बाधितांसाठी वरदान ठरले आहे. त्याठिकाणी कुठलेही पैसे न घेता रुग्णांना सर्व प्रकारची सेवा दिली जाते. मात्र, खासगी रुग्णालयात ऑक्सिजन व ओटू, रेमडेसिविर इंजेक्शन जवळपास सक्तीचे करण्यात आले आहे. या सर्व गोष्टींचे दर वाढल्याने रुग्णाचे नातेवाईक व मित्रपरिवार यासाठी सर्वत्र फिरत आहेत. मात्र, दुर्देवाने बिटको रुग्णालयात सर्व मोफत असताना ऑक्सिजन, ओटू व सर्व बेडसाठी काही ठरावीक हातावरील मोजण्याइतके कर्मचारी पैसे घेत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीचे फायनल होताच एक तासात संबंधित पाहिजे असलेला बेड मिळत असल्याचे रुग्ण व नातेवाईकांकडून बोलले जात आहे.
--
चौकट==
मृतदेह देण्यासाठी लागतात पैसे
रुग्णालयात एखादा रुग्ण मयत झाल्यास किट नसल्याचे सांगून त्याला खासगी ठिकाणाहून किट आणण्यास सांगितले जाते. ते किट आणून दिल्यानंतरही चार ते पाच तास मृतदेह ताब्यातच दिला जात नाही. परंतु, आर्थिक मिलीजुली केल्यानंतर रुग्णालयातूनच तत्काळ संबंधित विभागाचे काही कर्मचारी तत्काळ रुग्णालयात असलेले किट उपलब्ध करुन देतात, मृतदेह पॅक करुन देतात. किंबहुना आर्थिक देवाणघेवाणीनंतर खासगी ठिकाणाहून आणलेले किट दिल्यावर तत्काळ मृतदेह काही मिनिटांत पॅकींग करून मिळतो.