उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात चार कोटींचा मुद्देमाल जप्त
By विजय मोरे | Published: December 31, 2018 11:21 PM2018-12-31T23:21:00+5:302018-12-31T23:24:20+5:30
नाशिक : जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्यसाठ्यास प्रतिबंध करण्यास नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागास गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले यश आले आहे़ २०१८ या वर्षभरात तब्बल चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मद्य तसेच वाहनांचा समावेश आहे, तर यावर्षी सर्वाधिक असे एक हजार २९७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़

महाराष्ट्रात दारूवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात येत असल्याने त्या तुलनेने गुजरातमध्ये कमी कर आकारला जातो़ त्यामुळे पार्ट्यांचे आयोजक गुजरातमधून स्वस्त दारू आणण्याचा प्रयत्न करतात, तर दारूतस्करही गुजरातमार्गे वाहनांमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करतात़ नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने गुजरात व दिव-दमण तसेच सिल्वासामार्गे मोठ्या प्रमाणात कर चुकवून मद्याची चोरटी वाहतूक केली जाते़ राज्य उत्पादन शुल्क विभागाने २०१७ मध्ये ९५३ वारस गुन्हे दाखल करून दोन कोटी चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़, तर यावर्षी एक हजार २९७ गुन्हे दाखल करून चार कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ यामध्ये तब्बल ८१ वाहनांचा समावेश असून, गतवर्षीच्या तुलने जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन कोटी सात लाखांची वाढ झाली आहे़
नाशिक विभागातील अवैध पद्धतीने केली जाणारी मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष भरारी पथके तसेच सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली, हरसूल, पेठ तालुक्यांतील राजबारी या ठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत़
कारवाई अशीच सुरू राहणार
विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली भरारी पथके, सीमा तपासणी नाके तसेच विभागीय निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच जवान यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन कारवाई केली आहे़ त्यामुळेच वर्षभरात सुमारे तेराशे गुन्हे व चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले़ नवीन वर्षातही राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अशीच सुरू राहणार आहे़
- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक