मैत्री दिनाचा उत्साह मावळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:55 AM2020-08-03T00:55:29+5:302020-08-03T00:56:27+5:30
दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्याने, पर्यटनस्थळे सर्वच ठिकाणी सामसूम असल्याचे चित्र होते.
नाशिक : दरवर्षीप्रमाणे ‘मैत्री दिन’ यंदा शहरात साजरा होताना अनुभवयास आले नाही. कोरोनाच्या सावट असल्यामुळे तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना सोशल मीडियावर सचित्र उजाळा देणे पसंत केले. कॅफे, रेस्टॉरंट, उद्याने, पर्यटनस्थळे सर्वच ठिकाणी सामसूम असल्याचे चित्र होते.
महाविद्यालयीन जीवनात कट्ट्यांवरून बहरलेली मैत्री अधिकाधिक दृढ होत जाते. मैत्रीचे बंध कायमस्वरूपी टिकून रहावे, यासाठी दरवर्षी आॅगस्टच्या पहिल्या रविवारी आपल्या मित्रपरिवारासोबत तरुणाई एकत्र येत जल्लोष करत असते; मात्र यावर्षी तरुणाईचा मैत्री दिनाचा उत्साह कोरोनामुळे पूर्णपणे मावळल्याचे दिसून आले.
असा सूर गोदापार्क परिसरात एकत्र आलेल्या काही तरुणांच्या ग्रुपमधून उमटला. एरवी मैत्री दिनाला कॉलेजरोड, गंगापूररोड, सोमेश्वर मंदिर परिसर, दूधस्थळी धबधबा, फाळकेस्मारक, पांडवलेणी, नेहरू वनोद्यान, अंजनेरी, गंगापूर धरण परिसर गजबजलेला पहावयास मिळतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे गु्रप एकत्र येत ‘सेलिब्रेशन’ करतात; मात्र रविवारी (दि.२) तरुणाईच्या पसंतीचे वरील सर्व ठिकाणी निरव शांतता अनुभवयास आली. बोटांवर मोजण्याइतके ग्रुपचा अपवाद वगळता मैत्री दिन साजरा करताना कोणीही दिसून आले नाही.