विदेशातून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:47 AM2021-12-15T01:47:14+5:302021-12-15T01:47:33+5:30
आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तींची ओमायक्रॉनमुळे कडक चाचणी हाेत असतानाच नाशिकमध्ये माली देशातून आलेल्या तीन व्यक्तींपैकी एक जण कोरोनाबाधित असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जिनोम सिक्वेन्स पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्याबरोबर असलेल्या दोघांंना कोरोना संसर्ग नसला तरी त्यांना अंबड येथील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
नाशिक : आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तींची ओमायक्रॉनमुळे कडक चाचणी हाेत असतानाच नाशिकमध्ये माली देशातून आलेल्या तीन व्यक्तींपैकी एक जण कोरोनाबाधित असल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी जिनोम सिक्वेन्स पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्याबरोबर असलेल्या दोघांंना कोरोना संसर्ग नसला तरी त्यांना अंबड येथील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा नवा विषाणू अर्थातच ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला असून भारतातदेखील त्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार नाशिकमध्ये विदेशातून येणाऱ्या नागरिकांची गरजेनुसार तपासणी केली जात असली तरी शासनाच्या निर्देशानुसार विमानतळावरच ओमायक्रॉनसंदर्भात तपासणी केली जाते. त्यातच नाशिकमध्ये मालीहून आलेले तिघे जण धोकादायक देशांच्या यादीतील नसल्याने विमानतळावर तपासणी न होताच दाखल झाले. सातपूर येथील एबीबी कंपनीत कामासाठी आलेल्या या तिघांनी रविवारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर अंबड येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. कंपनीत जाण्यापूर्वी सोमवारी (दि. १३) त्यांनी कोरोना चाचणी एका खासगी लॅबमध्ये केली. त्याचा अहवाल मंगळवारी (दि. १४) प्राप्त झाला. त्यात ४९ वर्षीय नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले तर अन्य दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. मंगळवारी (दि. १४) सकाळी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला हा प्रकार कळल्यानंतर धावपळ उडाली आणि त्यांनी तातडीने संबंधित कोरोनाबाधित व्यक्तीला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी कोरोनाबाधितांपेक्षा आणखी एक वेगळा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून तेथे त्याला दाखल केले. अन्य दोन जणांना त्याच हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बाधित रुग्णाला ओमायक्रॉन आहे किंवा नाही याबाबत तपासणी करण्यासाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशाेधन प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्ससाठी नमुने पाठवण्यात येणार असून त्यानंतर त्या व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल.
कोट..
नाशिकमध्ये दाखल झालेल्या माली येथील नागरिकाला कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र, ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुणे येथील विषाणू संशोधन प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले आहेत. ते प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती कळेल.
- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका
इन्फो...
हॉटेल कर्मचाऱ्यांचीही तपासणी
अंबड येथे विदेशी नागरिक उतरलेल्या त्या हॉटेलमधील जे कर्मचारी संबंधित बाधिताच्या संपर्कात आले आहेत, अशा बारा कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांना बुधवारी (दि.१५) अहवाल येईपर्यंत गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
इन्फो...
विदेशी नागरिकही विलगीकरणात
माली येथील जो नागरिक बाधित आढळला, त्याचा अहवाल येण्यास किमान सहा ते सात दिवस लागतील. मात्र त्याला चौदा दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्याची पुन्हा कोरोना चाचणी होईल. तर दुसरीकडे त्या व्यक्तीसमवेत आलेेल्या अन्य दोघांना त्या हाॅटेलमध्येच सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची कोरोना करण्यात येणार आहे. त्या अहवालावर पुढील कार्यवाही ठरेल.