गोरेवाडीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 01:46 AM2022-07-06T01:46:34+5:302022-07-06T01:47:07+5:30

गोरेवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.५) आढळून आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही.

Excitement over finding the body of a woman in Gorewadi | गोरेवाडीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

घटनास्थळी भेट देत पाहणी करून पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे.

Next
ठळक मुद्देघातपाताचा पोलिसांना संशय : ‘व्हिसेरा’ राखला; शव कुजल्याने ओळख पटविणे अवघड

नाशिक : गोरेवाडी येथील शास्त्रीनगर परिसरातील चिडे मळा भागात उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.५) आढळून आला. मृतदेहाची ओळख पटलेली नसून महिलेच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही. महिलेचा हा घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चिडे मळा येथील उसाच्या शेतात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ऊसतोडणीसाठी कामगार गेले असता त्यांना उसाच्या शेताजवळ महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. यावेळी कामगार सोमनाथ जाधव यांनी त्वरित नाशिकरोड पोलिसांना माहिती कळविली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. काही वेळेतच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे हेदेखील घटनास्थळी पोहचले. यामुळे सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. महिलेचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. साधारणत: २० ते २५ वयोगटांतील तरुण महिला असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या मृतदेहाच्या गळ्यामध्ये ओढणी गाठ मारलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आली; मात्र शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.

---इन्फो--

निर्जनस्थळी मृतदेह; सीसीटीव्हींची तपासणी

महिलेचा मृतदेह शहराच्या टोकाला अशापद्धतीने निर्जनस्थळी मळे परिसरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महिलेची हत्या झाली की आत्महत्या? असा प्रश्न आता पोलिसांपुढेही उभा राहिला आहे. पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे पाच ते सहा किलोमीटरच्या परिघातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. मृतदेहावरील कपड्यांच्या रंगासारखे कपडे परिधान केलेली महिला कुठल्या सीसीटीव्हीमध्ये आढळून येते का? हे तपासून बघत आहेत.

 

 

Web Title: Excitement over finding the body of a woman in Gorewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.