जलकुंभात विषारी औषध टाकल्याने खळबळ

By Admin | Published: August 3, 2015 10:36 PM2015-08-03T22:36:14+5:302015-08-03T22:36:54+5:30

प्रशासन हादरले : वाजे यांच्यासह अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

The excitement by releasing toxic drug in the water body | जलकुंभात विषारी औषध टाकल्याने खळबळ

जलकुंभात विषारी औषध टाकल्याने खळबळ

googlenewsNext

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील तेलमाथा भागातील पिण्याच्या पाण्याच्या जलकुंभात अज्ञात समाजकंटकांनी विषारी औषध टाकल्याने खळबळ उडाली.
सदर प्रकार निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीतील गटनेते उदय सांगळे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी नमुने तपासणीला पाठवून संपूर्ण जलकुंभ धुवून साफ करण्यात आला आहे.
भोजापूर धरणातून मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. दापूर ग्रामपंचायतीने तेलमाथा भागातील सुमारे चारशे लोकवस्तीसाठी ३० हजार लिटरचा जलकुंभ बांधण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमार्फत या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेतूनच सदर जलकुंभ भरला जातो.
रविवारी दु. ४ वाजेच्या सुमारास जलकुंभाशेजारील सभामंडपात काही ग्रामस्थ झोपलेले होते. सोमनाथ मधुकर आव्हाड हा जलकुंभातील पाण्याने हात धुवत असताना त्यांना विषारी उग्र वास येऊ लागला. आव्हाड यांनी तातडीने सरपंच सोमनाथ कारभारी आव्हाड यांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. आव्हाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाणीपुरवठा बंद ठेवून पंचायत समिती प्रशासन व आमदार राजाभाऊ वाजे यांना घटनेची माहिती दिली.
आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांनी रविवारी सायंकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर पाणी न वापण्याचे आवाहन केले. त्यानंतर सदर जलकुंभाची साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी सकाळी गटविकास अधिकारी धनंजय जगताप, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन म्हस्के, नितीन गोडबोले, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायत प्रशासनाने जलकुंभाची स्वच्छता केली आहे. पाणी नुमने तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: The excitement by releasing toxic drug in the water body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.