विजयी उमेदवारांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:52 AM2019-10-25T01:52:23+5:302019-10-25T01:53:00+5:30
येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला.
नाशिक : येऊन येऊन येणार कोण... अशा घोषणेसह विजयी उमेदवारांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांच्या घोषणांनी मतमोजणी परिसर दणाणला होता. शहरातील पश्चिम, मध्य, पूर्व व देवळाली या सर्व मतदारसंघांत विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जयघोष करत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
पश्चिम मतदारसंघातील भाजपाच्या सीमा हिरे यांनी ९ हजार ५२१ मताधिक्यांनी विजय मिळविला. चुरशीच्या झालेल्या या लढतीमुळे मतमोजणी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अंतिम फेरीचा निकाल लागताच हिरे समर्थक ांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तर मध्य मतदारसंघातील भाजपाच्या देवयानी फरांदे यांना मतदारांनी पुन्हा कौल देत २८ हजार ५१३ मताधिक्यांनी विजय मिळवून दिला. यामुळे दादासाहेब गायकवाड सभागृह परिसरात त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत आनंद साजरा केला. यावेळी मुंबई नाका परिसरात विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण करण्यात आली. तसेच यावेळी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे पूर्व मतदारसंघात भाजपाचे राहुल ढिकले यांनी १२ हजार १३ मताधिक्यांनी विजय मिळवत जल्लोष साजरा केला. यावेळी पंचवटी परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतशबाजी केली. तर देवळाली मतदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी तब्बल ४१ हजार ८६० मताधिक्यांनी विजय मिळवून शिवसेनेचा ३० वर्षांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला सुरुंग लावला. यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड
निकालाची उत्सुकता असलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारनंतर मतमोजणी परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. चारही मतदारसंघांत विजयी झालेले उमेदवार हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याचे दिसत होते. त्यामुळे शेवटच्या काही फेऱ्या शिल्लक असताना कॉँग्रेस, शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्यामुळे त्यांनी परिसरातून काढता पाय घेतला.
कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क
ध्वनिक्षेपकावर प्रत्येक फेरीचा निकाल ऐकत कागदावर आकडेवारी करत तर्कवितर्क करण्याचे काम कार्यकर्ते करत असल्याचे दिसून आले. यावेळी काही अफवांमुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडले होते.