‘ब्रेक द चेन’ निर्बंधांतून ग्रंथालयांना वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:06+5:302021-04-17T04:13:06+5:30
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ नियमावलीतून अनेक आस्थापना, खासगी व्यावसायिकांच्या ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ नियमावलीतून अनेक आस्थापना, खासगी व्यावसायिकांच्या दैनंदिन कामकाजावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या नियमावलीतून ग्रंथालयांना नियमानुसार सूट देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सावाना पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालये सुरु ठेवण्याची परवानगी मिळावी, यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक बाधितांचा आकड्याचा आलेख वाढता असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गुरुवार (दि. १५)पासून प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमावलीत ग्रंथालये बंद ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. पण लॉकडाऊन काळात वाचनप्रेमींना ग्रंथालयांचा मोठा आधार मिळतो. अनेक वाचनप्रेमींना लॉकडाऊन काळात विरंगुळ्यासाठी किंवा स्वत:च्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी, यासाठी पुस्तकांची अत्यावश्यक गरज असते. तसेच नव्या पिढीला वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असतो. विनाकारण सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, घातक संकेतस्थळांकडे वाढणारा अधिकाधिक कल रोखण्यासाठी पुस्तके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे शासनाने नव्याने घालून दिलेल्या ‘ब्रेक द चेन’ या नियमावलीतून ग्रंथालयांना सूट देण्यात यावी, ग्रंथालयात कोविड नियमांचे पुरेपूर पालन करत वाचनप्रेमींना ज्ञानाचे दालन खुले करुन द्यावे, अशी विनंती पालकमंत्री भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी मांढरे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
कोविड काळात अनेकांवर एकटे राहण्याची वेळ येते. या काळात पुस्तकांची मोठी साथ मिळते. वाचनालयांना परवानगी दिल्यास ग्रंथालयांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पूरेपूर पालन केले जाईल.
- संजय करंजकर, कार्याध्यक्ष, सवाना, नाशिक