निवडणूक संदर्भातील कामावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:31 PM2020-01-02T16:31:58+5:302020-01-02T16:32:17+5:30
कळवण - दशवार्षिक जनगणना व प्रत्यक्ष निवडणूक काम वगळता शिक्षकांना कोणतेही शाळाबाह्य काम देऊ नये असा शासननिर्णय असतांना व उच्च न्यायालयानेही शिक्षकांना बी.एल.ओ.कामाची सक्ती करु नये असा निकाल दिला असतांना कळवण तालुक्यातील शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून बी. एल.ओ. चे काम करावे लागत आहे. या कामांवर तालुक्यातील शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याचे निवेदन तालुक्यातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांतआधिकारी डॉ पंकज आशिया यांना दिले आहे.
विशेष मोहिमांना सुट्टीच्या दिवशी मतदार नाव नोंदणी करणे,मयत मतदार वगळणे,मतदार तपशील दुरु स्ती करणे,दिव्यांग मतदारांचा शोध घेणे,मतदान कक्ष सुविधा,घरोघरी मतदान स्लीपांचे वाटप करणे,वेळोवेळी मिटींगला उपस्थित राहणे अशा स्वरूपाची वर्षभर निरंतर चालणारी कामे बी. एल.ओ. ना करावी लागतात. आता हायब्रीड बी. एल.ओ. अॅप च्या माध्यमातून पुन्हा घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांची माहिती तपासून आधार कार्ड अपलोड करावे लागत आहे. ग्रामीण भागातील मतदार गावाबाहेर स्वत: च्या मळ्यात वास्तव्य करून राहतात. यावर्षी पावसाळा चांगला असल्याने बहुतांश रस्ते खराब झाले आहे . नाल्यात आतापर्यंत पाणी वाहत आहे. त्यामुळे त्या मतदारांपर्यंत पाच सात किलोमीटर दूर पायपीट करणे जिकीरीचे आहे.
दुसरीकडे वर्गाचे अध्यापन,शाळेतील शालेय पोषण आहार,आॅनलाईन कामे,निष्ठा प्रशिक्षण,अध्यक्ष चषक स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन तंबाखू मुक्त शाळा, टॅग मिटींग,अशी शैक्षणीक कामे आहेत. याचा प्रत्यक्ष परिणाम शालेय कामकाज व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे.
बी. एल.ओ. कामासाठी इतर विभागांचे कर्मचारीही उपलब्ध असतांना जास्तीत जास्त शिक्षकांनाच या कामाची सक्ती केली जात आहे.काही महिला शिक्षकांना बी.एल.ओ चे काम दिले आहे.काही ठिकाणी तलाठी,ग्रामसेवक आहेत तेथील बी.एल.ओ. चे कामही काढून शिक्षकांनाच देण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षकांची या कामातून मुक्तता करु न इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सदर काम देण्यात यावे यासाठी शिक्षक समन्वय समिती कळवण च्या नेतृत्वाखाली बी.एल.ओ शिक्षकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया , तहसीलदार बंडू कापसे साहेब,गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांच्याशी चर्चा करून येथून पुढे कळवण तालुक्यातील सर्व शिक्षकांचा बहिष्कार असल्याचे निवेदन दिले,व व्हाट्स अप ग्रुप बी.एल.ओ कळवण मधून ‘लेफ्ट’ होण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय देशमुख,समितीचे अध्यक्ष संजय शिंदे,पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष निलेश भामरे, समितीचे जिल्हा नेते रामदास वाघ, आदिवासी शिक्षक संघटनेचे बाळू बागूल, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे बाबूलाल सोनवणे, बापू पगार,किरण आहिरे,वासुदेव देवरे,प्रशांत शेवाळे,प्रविण जाधव,सुनील आहेर,प्रविण भामरे,सुचिता पाटील व इतर बी.एल.ओ उपस्थित होते.