व्यायाम, मन:शांतीद्वारे निरोगी जीवन : रश्मी सोमाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:10 AM2018-06-21T00:10:06+5:302018-06-21T00:10:06+5:30
नाशिक : प्रदूषण, ताणतणाव, कमी दर्जाचे अन्न या गोष्टींमुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. या गोष्टी शरीरातील पेशींना मारक ठरत असून, या गोष्टींपासून शरीराचा बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ रश्मी सोमाणी यांनी केले. महेशनवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘निरोगी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. टिळकवाडीतील माहेश्वरी विद्यार्थी भवन येथे बुधवारी (दि.२०) हा कार्यक्रम पार पडला.
सोमाणी पुढे म्हणाल्या, सकाळी उठल्या उठल्या चहा न पिता पाणी व एखादे त्या त्या मोसमातील फळ खावे. त्यानंतर अर्ध्या तासाने नाष्टा व चहा घ्यावा. नाष्टा ताजा हवा. २१ दिवस असा सराव केल्यास शरीराला त्याची सवय लागेल. मानवी शरीरात चांगले व वाईट दोन्ही प्रकारचे जिवाणू असतात. रात्रभर तोंडात चांगले जिवाणू जमा झालेले असतात. त्यामुळे पाणी पिऊन, फळे खाऊन ते जिवाणू शरीरात जाऊ द्यावे. उठल्या उठल्या ब्रश करू नये. पोटाचा वाढता घेर या सर्वांना सतावणाऱ्या समस्येवर उपाय सांगताना वेळ मिळेल तेव्हा कपालभाती करण्याचा सल्ला देण्यात आला. श्वास घेणे व सोडणे असा व्यायाम करीत पोटाचा आकार स्थिर राखू शकता. पायी चालण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिल्पा हरकुट यांनी सूत्रसंचालन केले.
आरोग्याच्या अनेक समस्यांचे मूळ कमी पाणी पिणे हे असून, प्रत्येकाने दिवसभरात भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दररोेज कुठल्याही प्रकारचा किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा, ताठ बसावे, ताठ उभे रहावे. पोश्चर फार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.