ऐन पावसाळ्यात उन्हापासून रोपे वाचवण्याची कसरत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:16+5:302021-07-08T04:11:16+5:30
पेठ : जुलै महिना मध्यावर आला असताना भात व नागलीची रोपे उगवणीला पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील खरिपाची कामे ...
पेठ : जुलै महिना मध्यावर आला असताना भात व नागलीची रोपे उगवणीला पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील खरिपाची कामे पूर्ण खोळंबली असून, उगलेली रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
पेठ तालुक्यात भात व नागली ही प्रमुख पिके घेतली जातात. लावणी करण्यापूर्वी रोपांची उगवण केली जाते. तर पाऊस सुरू झाल्यावर भाताच्या खाचरात गाळ करून लावणीची तयारी केली जाते. यावर्षी जून महिन्यात काहीशा प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने भात व नागलीची बियाणे पेरणी केली; मात्र जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आला आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात कडक ऊन पडल्याने उगवलेली रोपे पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे कडक उन्हापासून रोपे वाचवण्यासाठी रोपांना सावली करावी लागत आहे.
---------------------
खाचरे कोरडी पडली
भाताची लावणी करताना खाचरात ( कुंडीत) साधारण गुढघाभर पाणी साचावे लागते. त्यामध्ये नांगर किंवा ट्रॅक्टरद्वारे गाळ केला जातो. यावर्षी जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने खाचरात पाणी साचले नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पुढील काही दिवस पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
----------------------
पेठ तालुक्यात भात व नागलीची रोपे तयार झाली असून, पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही, त्यामुळे रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे भात शेती संकटात येऊ लागली आहे.
-यशवंत गावंडे, शेतकरी गावंधपाडा ता. पेठ.
फोटो
07jul21peth01
-------------------------
पेठ तालुक्यात कडक उन्हामुळे भाताची रोपे वाचवण्यासाठी अशा प्रकारे कापडापासून सावली करावी लागत आहे. (०७ पेठ १)
070721\07nsk_6_07072021_13.jpg
०७ पेठ १