पेठ येथे मुदतबाह्य औषधे फेकली
By admin | Published: January 10, 2016 10:57 PM2016-01-10T22:57:17+5:302016-01-10T22:59:20+5:30
पेठ : जोगमोडी परिसरात टाकल्या हजारो बाटल्या
पेठ : तालुक्यातील सावळ घाटात मुदतबाह्य औषधांच्या दोनशे बाटल्या टाकून दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्या दिवशी जोगमोडी रस्त्यावरील निर्जनस्थळी अशाच प्रकारे मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे़
एकीकडे शासकीय आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात औषध साठा कमी असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे आदिवासी भागातील कुपोषण नष्ट करण्यासाठी शासनाकडून पुरविण्यात आलेला टॉनिकचा साठा तीन वर्षांचा कालावधी लोटूनही वाटप न झाल्याने मुदत संपल्यावर बिनधास्तपणे टाकून दिला जात असल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाऊन कुपोषणाची समस्या जैसे थे राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़ जोगमोडी परिसरात रस्त्यालगत टोनक्स सिरप व प्रुटिज सिरप हे कुपोषित बालकांना द्यावयाच्या औषधाच्या हजारो बाटल्या बेवारसपणे टाकून दिल्याचे दिसून आले़ ह्या बाटल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथे उत्पादित झाल्या असून, जुलै २०१२ मध्ये उत्पादित केलेले हे औषध जून २०१५ मध्ये कालबाह्य झाले आहे. तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला असतानाही सदरचे औषध लाभार्थींना वाटप न करता मुदतबाह्य झाल्यावर बेवारसरीत्या टाकून दिले आहे़ सदरची औषधे कोणत्या विभागाकडून खरेदी करण्यात आली होती, याचा शोध घेण्याचे आवाहन आरोग्य विभागावर येऊन ठेपले आहे. आदिवासी बालकांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़ (वार्ताहर)