उद्योजकांसाठी निलगिरी बागेत प्रदर्शन केंद्र

By admin | Published: February 19, 2015 12:27 AM2015-02-19T00:27:04+5:302015-02-19T00:31:53+5:30

मुंबईत बैठक : जऊळके वणीचाही पर्याय विचारात

Exhibition center for entrepreneurs in Nilgiris garden | उद्योजकांसाठी निलगिरी बागेत प्रदर्शन केंद्र

उद्योजकांसाठी निलगिरी बागेत प्रदर्शन केंद्र

Next

नाशिक : उद्योजकांना विपणन आणि प्रचारासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी पंचवटीतील निलगिरी बाग येथील २६ एकर जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यास उद्योगमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ही जागा शक्य न झाल्यास ओझरजवळ जऊळके वणी शिवारातील जागेचादेखील विचार होऊ शकतो. मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. निलगिरी बाग येथील जागा मिळावी यासाठी नाशिक महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून, त्यानंतर दुसऱ्या जागेचा विचार केला जाणार आहे.
नाशिकमध्ये उद्योग व्यवसायाच्या प्रदर्शनासाठी शासकीय जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी उद्योजकांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत होते, त्याला आता मूर्त स्वरूप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्योग विभागाने प्रदर्शन केंद्रासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासन तसेच औद्योगिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्लस्टर पद्धतीने हा प्रकल्प साकारण्याचा विचार आहे. यासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीस उद्योग खात्याचे सहसंचालक प्रवीण दाबेराव, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, महापालिकेचे मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पंचवटी विभागात निलगिरी बाग येथे असलेल्या जागेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ही जागा शहरात आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेली ही जागा ताब्यात घेण्यासाठी तसा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे ही जागा शक्य न झाल्यास जऊळके वणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या भूखंडाचा विचार केला जाणार आहे. प्रदर्शन केंद्रासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. यावेळी अन्य औद्योगिक विषयांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीत आशिष नहार, व्हिनस वाणी, मंगेश पाटणकर, मनीष कोठारी, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Exhibition center for entrepreneurs in Nilgiris garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.