प्रदर्शनातील गणरायाच्या विविध रूपांची भक्तांना मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:07 AM2018-09-20T00:07:42+5:302018-09-20T00:08:32+5:30
गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटी कोटी रुपे तुझी...’ या भक्तिगीतातून वर्णिलेल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रूपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रूपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे.
नाशिक : गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटी कोटी रुपे तुझी...’ या भक्तिगीतातून वर्णिलेल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रूपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रूपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे. निमित्त आहे, गणेशोत्सवानिमित्त चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक दीपक वर्मा यांनी रेखाटलेल्या गणरायांच्या विविध अवतार व ताम्रपत्रावरील रूपांच्या चित्रप्रदर्शनाचे. गंगापूररोडवरील हार्मनी कलादालनात श्री गणेश चित्रमाला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. हे चित्रप्रदर्शन येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२१) संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत सर्व गणेशभक्तांसाठी मोफत खुले राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, वैशाली जैन, विजयन सोहोनी, अॅड. मृणालिनी खैरनार, रघुनाथराव कुलकर्णी, बाळ नगरकर आदी उपस्थित होते. या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेली गणरायांची विविध रूपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचमुखी हनुमान अवतार, दत्तमुखी अवतार आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहेत. लक्षवेधी रंगसंगती, अलंकारिक-सृजनशील मांडणी हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्राकृतींमधील गणरायांच्या विविध रूपे बोलकी वाटतात. गणेशोत्सवामध्ये नाशिककरांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या ााडक्या बाप्पांची विविध रूपे न्याहाळण्याची संधी मिळाली असून नाशिककर गणेशभक्तांनी उद्घाटनाच्या दिवशी गणरायांची चित्ररूपे न्याहाळण्यासाठी गर्दी केली होती.