मनसेसह अपक्ष स्थायीतून हद्दपार
By Admin | Published: March 4, 2017 01:47 AM2017-03-04T01:47:07+5:302017-03-04T01:47:21+5:30
नाशिक : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या १४ मार्चला निवडणूक घेण्यात येणार असतानाच नगरसचिव विभागाने स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नियुक्तीचीही प्रक्रिया सुरू केली आहे.
नाशिक : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या १४ मार्चला निवडणूक घेण्यात येणार असतानाच नगरसचिव विभागाने स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नियुक्तीचीही प्रक्रिया सुरू केली आहे. स्थायी समितीवर भाजपाचे सर्वाधिक नऊ, तर शिवसेनेचे पाच सदस्य नियुक्त होतील, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढविल्याने आघाडीचे दोन सदस्य स्थायीवर असतील. मात्र, मागील पंचवार्षिक काळात सत्ताधारी असलेल्या मनसेसह अपक्षांचा एकही प्रतिनिधी स्थायीवर नसणार आहे.
महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या १४ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. सदर निवडणूक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या १६ सदस्य नियुक्तीचाही प्रस्ताव महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विशेष महासभेत ठेवला आहे. मात्र, त्याच दिवशी स्थायीची निवडप्रक्रिया न करता महापौरांकडून त्यासाठी अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत, तर शिवसेनेचे ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. महापालिकेची एकूण सदस्यसंख्या १२२ आहे. १२२ भागीले १६ यानुसार प्रती सदस्य नियुक्तीसाठी ७.६२ चा कोटा आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक नऊ, तर शिवसेनेचे पाच सदस्य स्थायी समितीवर जातील. उर्वरित २ सदस्यांसाठी रस्सीखेच असेल. कॉँग्रेस-राष्ट्रवादीमिळून १२ सदस्य आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केलेली होती. आता त्यांनी एकत्र गटनोंदणीही केल्यास त्यांचे दोन सदस्य स्थायीवर जाऊ शकतात. मात्र, मनसे, अपक्ष यांचा एकही सदस्य स्थायीवर नसेल. रिपाइं आणि भाजपा यांची केंद्र व राज्यात युती आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत रिपाइंला एकही जागा न सोडता भाजपाने रिपाइंविरुद्ध उमेदवार दिले होते. त्यात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा भाजपाचे रवींद्र धिवरे या उमेदवाराने पराभव केला, तर लोंढे यांच्या स्नुषा दीक्षा लोंढे या विजयी झाल्या. रिपाइंने भाजपाला पाठिंबा दिल्यास एखाद्या वर्षी रिपाइंच्या एकमेव सदस्याला भाजपाच्या कोट्यातून स्थायीचे सदस्यत्व मिळू शकते. गेल्यावेळी सत्ताधारी असलेल्या मनसेचा एकही सदस्य जाणार नाही, तर अपक्षांची सद्दी संपुष्टात आलेली आहे. (प्रतिनिधी)