ठरावीक भागधारकांना मतदानाचा हक्क नको, माजी संचालक राजेंद्र भोसलेंचे आयुक्तांना साकडे जिल्हा बॅँक निवडणूक
By admin | Published: February 11, 2015 12:56 AM2015-02-11T00:56:17+5:302015-02-11T00:56:17+5:30
ठरावीक भागधारकांना मतदानाचा हक्क नको, माजी संचालक राजेंद्र भोसलेंचे आयुक्तांना साकडे जिल्हा बॅँक निवडणूक
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या नोटिसीत पाच हजार किमतीचे भागधारण केलेल्या सभासदांनाच मतदानाचा अधिकार देण्याबाबतचा निर्णय हा ज्या सभासदांच्या भागभांडवलावर संस्था उभी राहिली किंवा ज्यांनी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, अशा सभासदांना मतदानापासून वंचित करण्याचा हा प्रकार असून, ही नोटीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मागे घ्यावी, अशी मागणी माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. राजेंद्र भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने नुकतीच एक नोटीस जाहीर केली असून, त्याद्वारे जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या नोटिसीनुसार क्रियाशील सभासद म्हणजे ज्या सभासदांनी पाच हजार किमतीचे भागधारण केले असतील, अशा सभासदानांच मतदानाचा हक्क प्राप्त होईल. राज्य सहकारी निवडणूक सचिव डॉ. आनंद जोगदंड यांच्या १४ जानेवारी २०१५ च्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांनी करावयाची कृती यामधील मुद्दा क्रमांक ३(ब) नुसार क्रियाशील सभासदत्व ही बाब निवडणुकीसाठी लागू नाही. याची प्राथमिक मतदार यादी तयार करताना कटाक्षाने नोंद घ्यावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.