दिवाळी खरेदीला उधाण
By admin | Published: October 17, 2016 12:51 AM2016-10-17T00:51:36+5:302016-10-17T01:06:05+5:30
खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड : रांगोळी, आकाशकंदील, दिव्यांना मागणी वाढली
नाशिक : हर्षोल्हासाचा दसरा सण आणि त्या पाठोपाठ येणारी दिवाळी म्हणजे संपूर्ण महिनाभराचा कालावधी आनंदाची पर्वणीच असते. अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली होती. प्रत्येकजण आपापल्यापरीने हा सण उत्साहात साजरा करतात. सण आता तोंडावर आल्याने सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत.
दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची व किराणामालाची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. तर अनेकजण दिवाळीच्या खरेदीचे बेत आखत आहेत. शहरात परिसरातील विविध गावांतून ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने दरवर्षी येथील बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे मेनरोड, दहीपूल, कॉलेजरोड आदि विविध भागांतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. रंगीबेरंगी व विविध आकारातील दिवे आणि पणत्या बाजारपेठेत दाखल झाल्या असून, काही दुकानदारांनी मांडणीही सुरू केली आहे.
गेल्या पंधरवड्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी शेतकरी खरिपाच्या हंगामासोबतच रब्बी हंगाम साधणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांनंतर शेतकरी कुटुंबामध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेचे भाव वाढले व डाळी, खाद्यतेल, रवा, मैदा यासह सर्वच मालाचे भाव कडाडल्याने यंदाच्या दिवाळीत ‘दिवाळं’ निघणार अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत असताना नागरिकांनी मात्र खरेदीची जय्यत तयारी केली असून, बाजारपेठाही ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.
(प्रतिनिधी)