नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:02 PM2020-12-31T22:02:10+5:302021-01-01T00:12:21+5:30
ओझर : सरते वर्ष २०२० हे जानेवारीत मोठ्या दिमाखात सुरू झाले असताना कोरोनाच्या लॉकडाऊनने अर्धे वर्ष निराशाजनक गेले असले तरी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्साह दिसून आला. नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ओझर : सरते वर्ष २०२० हे जानेवारीत मोठ्या दिमाखात सुरू झाले असताना कोरोनाच्या लॉकडाऊनने अर्धे वर्ष निराशाजनक गेले असले तरी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्साह दिसून आला. नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षात कृषी क्षेत्रात देखील अच्छे दिन येणार हे स्पष्ट दिसत असताना द्राक्ष पंढरीत मोठी उलाढाल होत असताना मार्चच्या शेवटच्या टप्प्यात असताना कोरोनाने तेजीत सुरू असलेल्या बाजारात मंदीची लाट आली. पोलिसांनी गावातल्या प्रत्येक गल्लीला छावणीचे रूप दिले. सरकारचे सूक्ष्म नियोजन देखील तितकेच प्रभावशाली ठरले. मुंबईला काम करणारे परप्रांतीय मिळेल त्या वाहनाने उत्तरेकडे कूच करत होते. त्यावेळची ती विदारकता अनेकांच्या मनातून अद्याप गेलेली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने त्यांना उपाशी न ठेवता आपल्या संस्कृतीचे दर्शन दिले. नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेकांना दंडुक्याचा प्रसाद मिळाला तर तितके गुन्हे देखील दाखल झाले.
कित्येकांच्या परिवाराच्या कर्त्यांना कोरोनामुळे जग सोडावे लागले ही गोष्ट या वर्षीची सर्वाधिक मारक बाब ठरली. बाजारातील निर्देशांक देखील झपाट्याने कोसळला तर अनलॉक होत असताना त्याने हवा तसा आधार देखील दिला.यंदाची दिवाळी कशी जाणार या चिंतेत सर्वच असताना त्याआधी एक एक टप्पा शिथिल करताना नागरिकांनी देखील बाजारात नवे चैतन्य आणले. अनेक पेठांमध्ये न भूतो अशी गर्दी झाली तर उलाढालीचे उच्चांक देखील मोठ्या दिमाखात अनेक क्षेत्राने गाठले. कृषी,पर्यटन,हॉटेल,निर्यात,आयात,रिटेल आदी क्षेत्र स्थिरावत गेले तर दिवाळी देखील लोकांनी ह्यकोरोना नव्हेचह्ण असे दाखवत बाजारात चैतन्य आणण्यात मोठा हातभार लावला. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी देखील बाजार पूर्वपदावर येत असताना त्याला नफ्याची मोठी धार लागल्याने दिवाळी नंतरदेखील बाजार स्थिर राहून गेला.
कांदा निर्यातबंदी उठविल्याने उत्साह
सरते शेवटी डिसेंबरच्या अखेर कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकणारा ठरला.येणाऱ्या २०२१ मध्ये तेजीची हीच झालर कायमस्वरूपी राहिल्यास मुख्य कणा असलेल्या कृषी क्षेत्रात देखील नवे इतिहास रचले जातील परंतु कोरोनाची काळजी मनाच्या एका कोपऱ्यात सुरवातीचे काही महिने तरी घर करून बसेल हे मात्र तितकेच स्पष्ट आहे.