पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भरपाईची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:39 AM2019-08-15T01:39:25+5:302019-08-15T01:39:42+5:30
गोदावरीला आलेला महापूर आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढा, लाखलगाव या ठिकाणी अनेकांचे नुकसान झाले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली.
एकलहरे : गोदावरीला आलेला महापूर आणि सातत्याने होणाऱ्या पावसामुळे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, हिंगणवेढा, लाखलगाव या ठिकाणी अनेकांचे नुकसान झाले. शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली.
या सर्व परिस्थितीचे पंचनामे करण्यासाठी गावोगावी तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी बांधाबांधावर व घरोघरी जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे.
दरम्यान, पूरग्रस्तांना प्रत्येकी १० किलो गहू व १० किलो तांदूळ आपापल्या भागातील स्वस्त धान्य दुकानातून देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. जुने सामनगावातील २३ पूरग्रस्त कुटुंबांना पंचनामे केल्यानंतर त्यांना धान्याचे वाटप करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तलाठी चौधरी, कृषी सहायक विद्या फुसे, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामसेवक बापू पवार या पथकाकडून करण्यात येत आहेत.
कोटमगाव येथे सरपंच बाळासाहेब म्हस्के, कृषीमित्र पोपट म्हस्के, कारभारी घुगे, तलाठी चौधरी यांनी पंचनामे केले.
जाखोरी येथे तलाठी किशोर बाचकर, कृषी सहायक रणजित आंधळे, ग्रामसेवक उत्कर्ष पाटील, सरपंच सुनीता कळमकर, विश्वास कळमकर, उपसरपंच अशोक धात्रक यांनी पंचनामे केले.
दरम्यान, हिंगणवेढे येथे अजूनही पंचनामे सुरू झाले नसल्याचे सरपंच अनिता धात्रक यांचे चिरंजिव
विक्र म धात्रक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बाभळेश्वर येथे ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, सरपंच मंगल पगारे, उपसरपंच सिंधू टिळे, तलाठी यांनी नुकसानग्रस्त शेती व घरांचे पंचनामे केले. लाखलगाव येथे ग्रामसेवक के. एम. बरु , तलाठी मनीषा पाटील, सरपंच स्वाती हिले, उपसरपंच यांनी पंचनामे केले.
दारणेचा रौद्रावतार ५ ते ७ तारखेपर्यंत भयंकर होता. पाणी क्षणाक्षणाला वाढत जाऊन घरात शिरले तेव्हा मात्र तारांबळ उडाली. काय करावे सुचेना. अशावेळी सरपंच मंगल पगारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, उपसरपंच सचिन टिळे, सुरेश टिळे, दत्तू टिळे, दत्तू पगार यांनी शाळेमध्ये स्थलांतरित केले. पूर कमी होईपर्यंत जेवण आणि कपड्यांची व्यवस्था केली.
-संजय हांडगे, मोहगाव
दोन दिवस आमच्या घराला दारणेच्या पूर पाण्याचा वेढा होता. घरातील धान्य, सामान वाहून गेले. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने काही प्रमाणात कांदा वाहून गेला. शिल्लक राहिलेल्या कांद्याचा उग्र वास येऊ लागला व कोंबही फुटले. -दशरथ कटाळे, जुने सामनगाव
गेल्या १५ वर्षांतील यंदा दारणेच्या पुराचा उच्चांक होता. नदीतील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने पात्र मोठे झाले आहे. बाभळेश्वरच्या बाजूने किनारा संपूर्ण मातीयुक्त असल्याने मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे पुराचा प्रवाह वेगाने शेतात व घरामध्ये शिरला. रात्रीच्या वेळी पाणी शिरल्याने अंदाज आला नाही अन् त्यामुळे धावपळ झाली. घरातील फर्निचर, भांडे, कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. पाण्यामुळे भिंती पडल्या, सामान वाहून गेले. संसार उभा कसा करावा ही चिंता सतावते आहे. पूरपरिस्थिती होती आमची राहण्याची सोय ग्रामस्थांनी केली होती. नुकसानभरपाई मिळावी. - रेणुका धुळे, लाखलगाव