अतिमहत्त्वाकांक्षा वाईट मार्ग दाखविते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:01 AM2018-11-25T01:01:47+5:302018-11-25T01:02:33+5:30
महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.
नाशिक : महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.
ओम साई श्री सच्चिदानंद बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. सोनाली कुलकर्णी-गायकवाड लिखित व अरुण भावसार दिग्दर्शित ‘अश्वमेध’ नाटक परशुराम साईखेडकर सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत सादर करण्यात आले. हे एक काल्पनिक नाटक असून ‘निषाद’ साम्राज्याची महाराणी नीलाक्षी महत्त्वाकांक्षी असते; मात्र तिच्याकडून महत्त्वाकांक्षेचा अतिरेक होतो याभोवती ‘अश्वमेध’चे कथानक फिरत जाते. नीलाक्षीला पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो.
त्यामुळे नीलाक्षी वैद्याकडून तपासणी करून घेते. अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय योग्य असल्याचे वैद्य सांगतात. त्यामुळे नीलाक्षी जास्त महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहायक अश्विनद्वारे ती मातृत्व प्राप्त करून घेत राजा कृतसेनचा अश्विनच्या माध्यमातून विष देऊन खून करते. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात अश्विनचाही ती बळी देते. महापराक्रमी सम्राज्ञी महाराणी बनण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न नीलाक्षी पूर्ण करते. या नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मदुरा सोनवणे, सचिन दलाल, हरीश परदेशी, राजेश टाकेकण यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य अविनाश देशपांडे यांचे तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती.