साऱ्याच इच्छुकांच्या अपेक्षा उंचावलेल्या

By admin | Published: July 2, 2014 09:24 PM2014-07-02T21:24:59+5:302014-07-03T00:19:55+5:30

मोदी लाट विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही या अपेक्षेने अन्य पक्षांमध्येही चुरस आहे.

Expecting the expectations of most interested | साऱ्याच इच्छुकांच्या अपेक्षा उंचावलेल्या

साऱ्याच इच्छुकांच्या अपेक्षा उंचावलेल्या

Next

लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे आडाखे चुकवत मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात महायुतीने आघाडी घेतल्याने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दुसरीकडे मोदी लाट विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही या अपेक्षेने अन्य पक्षांमध्येही चुरस आहे.
जुन्या नाशिकसारखा भाग एकीकडे आणि कॉलेजरोड, गंगापूररोडसारखा उच्चभ्रू भाग दुसरीकडे असा हा मतदारसंघ आहे. तथापि, कॉँग्रेससारख्या साऱ्याच पक्षांची दलित, मुस्लीम, ओबीसी मतदारांवर मदार आहे. दरवेळी निवडणुकीत हा मतदार निर्णायक ठरतो. गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मनसेवर कोणताही शिक्का नसल्याने त्यांना या भागाचा आणि उचभ्रू वसाहतींचा फायदा झाला होता; परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघाने पारंपरिक राजकीय समीकरणे मोडीत काढली आणि महायुतीच्या उमेदवाराला पंधरा हजारांचे मताधिक्य दिले. साहजिक कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतपेढीनेच त्यांना धक्का दिला. साहजिकच त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषत: भाजपा लोकसभा निवडणुकीतील यशामुळे सेनेवर दबाव टाकू लागली
आहे.
कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीनेदेखील अशाच प्रकारच्या खेळी सुरू झाल्या आहेत. गेल्यावेळी मतदारसंघ कॉँग्रेसकडे असल्याने या पक्षाकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. तथापि, राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ यांचे नाव पुढे येऊ लागल्याने मध्य नाशिकमध्ये अदलाबदल शक्य मानली जाऊ लागली आहे. जागावाटपाबाबत
आज कोणीही भाष्य करीत नसले, तरी मतदारसंघात अदलाबदल
होऊ शकते, हे पक्षाचे नेते खासगीत मान्य करतात.
अन्य पक्षांमध्ये माकपाचा या मतदारसंघात प्रभाव नाही. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. रिपाइं (आठवले गट) महायुतीत सामील असल्याने त्यांच्याकडून दावेदारी आहेच. समाजवादी पार्टी आणि अन्य फुटकळ पक्षांकडून उमेदवार उभे केले जाऊ शकतात.भाजपात अतिउत्साह
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा भाजपाला फायदा झाल्याने स्थानिक पातळीवरही भाजपाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत भाजपाच्या इच्छुकांना धुमारे फुटले आहेत. मध्य नाशिक मतदारसंघ शिवसेनेकडे असला, तरी भाजपाकडेही इच्छुक अधिक आहेत. राष्ट्रवादीतून भाजपात त्याच उद्देशाने सुरेशअण्णा पाटील आले आहेत. याच मतदारसंघातून सीमा हिरेदेखील नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. मतदारसंघात एका टोकाला उच्चभ्रू मतदारांचा विचार करून अन्य अनेक जण इच्छुक आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे माजी शहराध्यक्ष विजय साने तसेच विद्यमान उपमहापौर सतीश कुलकर्णी इच्छुक आहेत. मध्य नाशिक नाही मिळाला तर पश्चिम आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाऐवजी मध्य अशी तडजोड करायला भाजपाचे बहुतांशी इच्छुक तयार आहेत.सेनेत मोजकेच, पण प्रबळ दावेदार
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जागावाटप करताना सेनेला दिलेला मतदारसंघ सध्याच्या इच्छुकांच्या पथ्यावर पडला आहे. गेल्यावेळी शिवसेनेच्या वतीने सुनील बागुल यांनी निवडणूक लढविली परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. आता ते राष्ट्रवादीत असल्याने सेनेच्या अन्य इच्छुकांच्या अपेक्षा बळावल्या आहेत. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते हेच सध्या प्रभावी दावेदार आहेत. जिल्हा संघटक, संपर्कमंत्री आणि प्रदेशपातळीवरदेखील नेत्यांकडे त्यांनी चांगलीच व्यूहरचना आखली आहे. माजी महापौर विनायक पांडे हे आणखी एक प्रबळ दावेदार. मुस्लीमबहुल मतदारसंघातून यापूर्वी ते महापालिकेत निवडून आले होते. अशाच प्रकारे सचिन मराठे यांनीदेखील तयारी केली आहे. तब्बल तीन वेळा नगरसेवकपद भूषविणाऱ्या मराठे यांनी या पदावर दावा सांगितल्याने शिवसेनेत इच्छुकांमध्ये रंगत वाढली आहे.कॉँग्रेसमध्ये नवा चेहरा
गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात कॉँग्रेसच्या ताब्यात होता. गेल्यावेळी कॉँग्रेसच्या माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी निवडणूक लढविली होती. गेल्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मध्य नाशिकमधील विशेषत: जुन्या नाशिकसह परिसरातील दलित-मुस्लीम मतांचा प्रभाव असल्याने कॉँग्रेसला हा मतदारसंघ सोपा वाटतो. साहजिकच या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते आहे. शोभा बच्छाव यांनी यंदाही पूर्व नाशिकच्या चाचपणीबरोबर हा मतदारसंघ एक पर्याय ठेवला आहे. त्याचबरोबर माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे प्रबळ दावेदार आहेत. गेल्यावेळी कुटे यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती; परंतु बच्छाव यांचा पराभव झाल्याने आता कुटे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतु अशाच प्रकारे स्थायी समितीचे माजी सभापती शाहू खैरे यांचीही यंदा प्रबळ दावेदारी आहे. पालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील यांनीही मध्य नाशिकमध्ये तयारी केली आहे. अशाच प्रकारे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड आता रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. रिपाइंही इच्छुक
मध्य नाशिक मतदारसंघातील दलित-मुस्लीम मतदारांनी आजवर धर्मनिरपेक्ष शक्तींना साथ दिली आहे. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच रिपाइं, समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांनीदेखील आजवर नशीब आजमावले आहे. आताही महायुतीत असलेल्या रिपाइं आठवले गटाकडून तयारी सुरू आहे. प्रकाश लोंढे हे दावेदार आहेतच; शिवाय याच पक्षाचे महानगरप्रमुख पवन क्षीरसागर हेही दावेदार आहेत. माकपाचा या मतदारसंघात प्रभाव जवळपास नाहीच. त्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारीची शक्यता कमी आहे. समाजवादी पार्टी आणि तत्सम पक्ष उमेदवार उभा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या भूमिकेत बदल झाल्यास आम आदमीचा एक उमेदवार वाढण्याची शक्यता आहे.ंमनसेसमोर अस्तित्वाचा प्रश्न
गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे नवीन असतानाही नाशिक शहरात ज्या जागेविषयी मनसेला हमखास यशाची अपेक्षा होती ती एकमेव जागा म्हणजे मध्य नाशिक ! या जागेवर अपेक्षेप्रमाणेच वसंत गिते यांनी बाजी मारली होती. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर मात्र मनसेची लाट नाही. पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. संघटन कौशल्याबाबत नावाजलेल्या वसंत गिते यांच्या विरोधात पक्षातही वातावरण आहे. विद्यमान आमदार आणि पक्षाचा मास चेहरा असल्याने गिते यांना उमेदवारी मिळण्यात अडथळा नाही; परंतु राज यांच्या मनात आलेच तर चेहरा बदलणे काही अवघड नाही. मध्य नाशिकचाच विचार केला तर पक्षात डॉ. प्रदीप पवार यांचा एक पर्याय होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा चेहरा लोकांसमोर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे आणखी एक पर्याय म्हणून महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांचा विचार होऊ शकतो. मीतभाषी आणि संपूर्ण शहराचे महापौर असल्याने त्यांचादेखील विचार होऊ शकतो.

Web Title: Expecting the expectations of most interested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.