नाशिकला पर्यटन मार्गाचा लाभ मिळण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:14 AM2019-07-06T00:14:18+5:302019-07-06T00:20:35+5:30
रेल्वेमंत्र्यांनी प्रथमच खासगी सहभागातून प्रायव्हेट रेल्वे गाड्या चालविणार असून, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या गाड्या देशातील पर्यटनाच्या ठिकाणी सर्वप्रथम चालविण्याचे नियोजन जाहीर केले आहे.
नाशिक : रेल्वेमंत्र्यांनी प्रथमच खासगी सहभागातून प्रायव्हेट रेल्वे गाड्या चालविणार असून, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. या गाड्या देशातील पर्यटनाच्या ठिकाणी सर्वप्रथम चालविण्याचे नियोजन जाहीर केले आहे. नाशिक हे तीर्थ आणि पर्यटन क्षेत्र असल्यामुळे आधुनिकीकरणातील खासगी गाड्या नाशिकपर्यंत पोहचू शकतील अशी अपेक्षा आहे. मात्र पर्यटनाचे कोणते मार्ग असतील याची स्पष्टता अद्याप नसल्याने तूर्तास नाशिकच्या समावेशाबाबत नक्की काय होणार यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याच्या प्रतिक्रीया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाचे बजेट सादर करताना त्यामध्ये रेल्वेचेही बजेट मांडले. अत्याधुनिक सुविधा, मेट्रो, रॅपीड रेल, सिग्नल आणि स्थानकाचे आधुनिकीकरण याबरोबरच सिग्नल यंत्रणेच्या सुधारणांवर भर असणारा अर्थसंकल्प सादर केला. परंतु सर्वसाधारण प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आरक्षणाचा कोटा आणि लोकल सुविधांबाबतची स्पष्टता नसल्याने रेल्वे प्रकरणी मान्यवरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. असे असले तरी पर्यटनक्षेत्र म्हणून नाशिकसाठी खासगीकरणातील रेल्वे गाडी मिळू शकेल असे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे आणि रेल परिषदेचे सचिव देविदास पंडीत यांनी सांगितले.
यंदाच्या रेल्वे अर्थसकल्पात अर्थमंत्र्यांनी रेल्वे आधुनिकीकरण आणि सुरक्षिततेवर भर दिला आहे. याबरोबरच रेल्वे विस्तारणासाठीदेखील मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. नव्या रेल्वे गाड्यांच्या बाबतीतील स्पष्टता लगेचच कळणार नाहीच शिवाय नव्या गाड्या आणि रेल्वे मार्ग विस्तारीकरणाचा मुद्दादेखील प्राधान्याने मांडण्यात आला आहे. रेल्वेमंत्र्यांनी ३०० किलोमीटर मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, मात्र यामध्ये कोणते मार्ग असतील हे कळू शकलेले नाही. रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने प्रवासी आणि मालवाहतूक दर महत्त्वाचे असतात. परंतु वित्तमंत्र्यांनी ‘आदर्श दर कायदा’ अमलात आणण्याची घोेषणा केल्यामुळे आता तिकीट दराचा निर्णय या संदर्भात गठित समितीच्या अंतर्गत येऊ शकतो अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली
केवळ नाशिकचा विचार करता केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये नाशिकला काही मिळू शकेल किंवा नाशिकचा समावेश होऊ शकेल, अशी शक्यता कमी आहे. आधुनिक रेल्वेस्थानक, मॉडेल स्टेशन’ तसेच धार्मिक शहरातील स्थानक म्हणून नाशिक रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्याच्या घोषणा यापूर्वी झालेल्या आहेत मात्र सिंहस्थात रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे आणि एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म निर्माण करण्यापलीकडे कामे होऊ शकलेली नाहीत. सुविधांच्या बाबतीत स्थानक दुर्लक्षित राहिले आहे.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाची मंजुरी यापूर्वी दोनदा जाहीर करण्यात आली आहे. सारखी सर्वेक्षण मंजुरीविषयीची घोषणा होते. प्रत्यक्षात कामकाजाविषयी काहीच होताना दिसत नाही. यंदा याबाबत काहीतरी होईल असे वाटत होते. पण स्पष्टता नाही. लोकल सेवेचा विषयही केवळ चर्चेचा ठरला आहे. इगतपुरी भुसावळ चौथ्या ट्रॅकची गरज पूर्ण होते की नाही हे पाहवे लागेल़ - राजेश फोकणे, सदस्य,
रेल्वे सल्लागार समिती
नाशिकहून कल्याणपर्यंत लोकल सुरू होणार, रॅक तयार आहे याबाबत अनेकदा चर्चा झाली, पाहाणी, चाचणीदेखील अनेकदा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मुहूर्त लागणे अपेक्षित आहे. दुसरी बाब म्हणजे मुंबई-भुसावळ थेट स्पेशल एक्स्प्रेस असावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षाेंपासून आहे. या मागणीचा विचार अजूनही झालेला नाही. तिकीट आरक्षणातील गोंधळ दूर होणे अपेक्षित आहे.
- देवीदास पंडित, सचिव, रेल परिषद