जुने वाडे करणार निर्मनुष्य : धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:37 AM2018-08-07T01:37:20+5:302018-08-07T01:37:34+5:30
जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
नाशिक : जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे असलेल्या मिळकती वगळून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. दरवर्षी महापालिकेच्या वतीने शहरातील गावठाण भागातील धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावल्या जातात. आपल्या मिळकतीचा धोकादायक भाग उतरवून घ्यावा अन्यथा होणाऱ्या आपत्तीस संबंधित नागरिकच जबाबदार राहतील, अशा आशयाच्या या नोटिसा असल्या तरी संबंधित वाडेमालक धोकादायक भाग उतरवून घेत नाही. त्यातच रविवारी जुन्या तांबट आळीतील काळे यांचा वाडा पडल्याने दोन जण ठार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी ही भूमिका घेतली आहे.
महापालिका हद्दीत ३९७ धोकादायक वाडे आहेत. महापालिका त्यांना पारंपरिक पद्धतीने नोटिसा बजावत असते. परंतु तरीही नागरिक घर सोडत नाहीत. एप्रिल-मे महिन्यात होणाºया धोकादायक घरांच्या सर्वेक्षणानंतर बांधकाम विभाग नोटिसा देण्यास विभागीय अधिकाºयांना कळवत असते. परंतु तरीही नागरिक हटत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे.
धोकादायक घरांना डागडुजी करूनही नागरिक राहात नाहीत, असे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता यातील घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणे असतील तर ती सोडून ही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता पोलिसांच्या मदतीनेच धोकादायक घरातील नागरिकांना बाहेर काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेच्या इतिहासात धोकादायक घरांच्या बाबतीत प्रथमच इतकी कठोर भूमिका घेतली जात आहे. तथापि, बहुतांशी नगरसेवकांनीदेखील या मोहिमेचे स्वागत केले आहे. जीव गमविण्यापेक्षा महापालिकेच्या कार्यवाहीच्या निमित्ताने घर रिकामे होणे महत्त्वाचे असल्याचे मत नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी व्यक्त केले.
काजीगढीच्या रहिवाशांनादेखील सूचना
महापालिकेच्या वतीने विविध धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची मोहीम राबविण्यात येणार असली तरी धोकादायक काजीच्या गढीबाबत नागरिकांनी स्वत:हून बाहेर पडण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. काजीगढी दर पावसाळ्यात घसरत असते. गेल्या तीन ते चार वर्षांत अशाप्रकारे काजीगढी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे आता तेथेदेखील कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.