सिटी उद्यानाला देखभालीअभावी बकालस्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:37 AM2018-11-27T00:37:11+5:302018-11-27T00:37:29+5:30
: येथील सिटी उद्यानाला देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले असून, तातडीने देखभाल करण्याची आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे.
इंदिरानगर : येथील सिटी उद्यानाला देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले असून, तातडीने देखभाल करण्याची आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. तसेच सिटी उद्यानात केव्हा कात टाकणार आणि बालगोपाळांची गैरसोय दूर होणार? असा प्रश्न निर्माण नागरिकांना झाला आहे. इंदिरानगर परिसरात एकही मोठे उद्यान नसल्याने नागरिकांच्या मागणीनुसार सुमारे दहा वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅकलगत उद्यानाची निर्मिती करण्यात आली. सुमारे सहा एकर जागेत सिटी उद्यान तयार करण्यात आले. त्यावेळी एम्पी थिएटर, लॉन्स, आकर्षक विद्युत दिवे आणि खेळणी तसेच पे खेळणीसुद्धा बसवण्यात आल्या. त्यामुळे इंदिरानगर, राजीवनगर, विनयनगर, साईनाथनगर यांसह शहरातील विविध उपनगरांतील बालगोपाळ घेऊन नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत असत. त्यामुळे नेहमीच उद्यान फुललेले असायचे. सुमारे दोन ते तीन वर्षेच सिटी उद्यान व्यवस्थित होते. त्यानंतर हळूहळू देखभालीअभावी दयनीय अवस्था होण्यास सुरु वात झाली. आज बऱ्याच ठिकाणी लॉन्स पाण्याअभावी वाळले असून काही खेळणी तुटलेल्या अवस्थेत पडून आहे. तसेच पे खेळणीसुद्धा बºयाच दिवसांपासून बंद असल्याने त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. आकर्षक लावलेले दिवे निखळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सिटी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्यातच येथे टवाळखोर, प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. त्यामुळे बालगोपाळांच्या संख्येत घट होत झालेली दिसून येत आहे. शहरातील विविध उपनगरांपैकी सिटी उद्यान मोठे असून, त्याची दुरुस्ती करून खेळणी बसविणे गरजेचे आहे.
अनेक महिन्यांपासून कारंजा बंद
उद्यानाची देखभालअभावी दिवसेंदिवस बकालस्वरूप प्राप्त होत चालले आहे. तातडीने देखभाल आणि कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून कारंजाही बंद आहे. तसेच ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचे पाऊच पडलेले असतात.