महाग भाज्या; ग्राहकांना सजा
By admin | Published: June 14, 2016 10:53 PM2016-06-14T22:53:03+5:302016-06-14T23:58:51+5:30
गृहिणींचे बजेट कोलमडले : दर दुप्पट, पावसाची प्रतीक्षा
नाशिक : राज्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई असल्याने आणि जिल्ह्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याची उपलब्धी होत नसून शेतीही धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांना अल्पशा पाण्यावर भाजीपाला काढावा लागत आहे. मंडईतील भाज्यांची आवक कमी तर भाव जास्त असा प्रकार त्यामुळे पहायला मिळतो आहे. भाज्यांच्या भावात दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली असताना आणि पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झालेले असताना पिकांना पाणी कसे द्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तीन-चार महिन्यांपासून जिवाचे रान करून लावलेला भाजीपाला आता जगवायचा कसा याची त्यांना भ्रांत पडलेली दिसते आहे. भाजीविक्रेते आणि सर्वसामान्य ग्राहक यांना भाववाढीचा सामना करावा लागत आहे. पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजीविक्रेते, हॉटेलचालक व गृहिणींशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)