गतवर्षीच्या संमेलनाचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:47+5:302021-01-13T04:33:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांची नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी भेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांची नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या सदस्यांनी भेट घेतली. या संमेलनातील अधिक-उणे समजून घेत नाशिकच्या समितीने त्यांचे अनुभवाचे बोल जाणून घेतले.
नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे सदस्य प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर आणि सुभाष पाटील यांनी उ्स्मानाबाद संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवि केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी अवगत केल्या. संमेलन यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारधारा ठेवा. सतत नवोपक्रम राबवा, हे संमेलन नाशिककरांना आपले वाटावे यासाठी सर्वांना सहभाग द्या, निधी जमा करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करा, असे यशाचे सूत्र होते, याची माहिती संयोजन समितीने दिली. संमेलनानिमित्त अतिशय सुंदर स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामागची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्टीदेखील संयोजकांनी समजावून सांगितली. संमेलनाचे यश हे एकट्यादुकट्याचे नसते त्यासाठी सतत राबणारे सेवाभावी, कल्पक कार्यकर्त्यांची गरज असते. संमेलनाचे यश टीम वर्कमध्ये असते. टीममध्ये अधिकाधिक राबणारी माणसे प्रसिद्धीपासून दूर असतात. त्यांना संमेलनाच्या संयोजनात महत्त्वाचे स्थान असावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. तसेच काय करावे, हे सांगतानाच काय करू नये, याबाबतही उस्मानाबादच्या आयोजकांनी मौलीक सल्ले दिले आहेत.