ब्रह्मगिरीला परिसंवेदनशील घोषित करण्यासाठी तज्ज्ञांची रसद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 01:48 AM2021-07-30T01:48:53+5:302021-07-30T01:49:22+5:30
ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.
नाशिक : ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन तज्ज्ञ जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.
नदी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. नीलेश हेडा तर वने क्षेत्रातील तज्ज्ञ मोहनभाई हिराभाई ही या दोन तज्ज्ञांची नावे असून ते जिल्हाधिकाऱ्यांना सक्रिय मदत करतील, असे राजेंद्रसिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेत ब्रह्मगिरीची जैव विविधता आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे ती अधिक महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.
नाशिकच नव्हे तर सात राज्यांत गोदावरी नदीचा संबंध येतो. त्यामुळे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी बेकायदा उत्खनन सुरू करण्यात आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्याविरुद्ध नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर या लढ्यात राजेंद्रसिंहदेखील सहभागी झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी सात राज्यांतील पर्यावरणप्रेमीही या लढ्यात सहभागी करून घेतले होते. नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर राजेंद्रसिंह यांनी बुधवारी (दि. २८) जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ब्रह्मगिरी पर्वत परिसंवेदनशील घोषित करण्यात येईल, असे सांगितले आणि त्यानुसार सायंकाळीच अधिसूचनादेखील जारी केली आणि गुरुवारी (दि. २९) त्याचे कामदेखील सुरू केले आहे, तसे जिल्हाधिकाऱ्यांनी राजेंद्रसिंह यांना कळवले आहे.