तज्ज्ञांचा सूर : मानव-बिबट संघर्षावर पिंजऱ्याद्वारे मात अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:45 PM2018-04-29T17:45:09+5:302018-04-29T17:45:09+5:30
जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते
नाशिक : बिबट्या भयंकर अशा मनुष्यप्राण्यासोबत जगण्यास शिकला; मात्र मनुष्यप्राणी त्याच्यासोबत जगणे शिकलेला नाही. पिंजरे लावून बिबट्या आणि मानवामधील संघर्ष सुटणार नाही, तर तो अधिक वाढत जाणार आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राबाबत जनजागृती होणे काळाची गरज आहे, असा सूर परिसंवादातून उमटला.
वनविभाग पुर्व-पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित ‘मानव-बिबट्या यांच्यातील परस्पर संबंध’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उंटवाडी रस्त्यावरील वन निरिक्षण कुटीमधील सभागृहात झालेल्या या परिसंवादात वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे, पत्रकार रंंजीत जाधव यांनी प्रामुख्याने भाग घेतला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती, डॉ. शिवाबाला एस., सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, राजेंद्र कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, सुनील वाडेकर, संजय भंडारी यांसह शहरातील विविध वन्यजीव अभ्यासक, पत्रकार, वनरक्षक उपस्थित होते. जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुर्वे म्हणाले, बिबट्या या वन्यप्राण्याचा खरा तर जगण्याशी संघर्ष सुरू आहे. नैसर्गिक अधिवास काळानुरूप संपल्याने बिबट्या अनेकदा मानवी वसाहतीजवळही दिसून येतो. भूक भागविण्यासाठी बिबट्याची शेकडो किलोमीटरची भटकंती होत आहे. मानवी वस्तीजवळ असलेल्या आधिवासाशी जुळून घेत बिबट्या जवळपास राहण्यास पटाईत आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजºयाचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो; मात्र मानवी वस्तीजवळ असलेल्या थोड्याफार जंगलच्या भागातही पिंजरे लावण्याची मागणी जेव्हा होते तेव्हा अशी मागणी मानव-बिबट संघर्ष अधिक वाढविणारी असते. कारण पिंज-यात एक बिबट्या जेरबंद जरी झाला तरी त्याचा कॉरिडोरचा ताबा दुसरा बिबट्या घेत असतो, हे संशोधनातून पुढे आले आहे, असे सुर्वे म्हणाले.
प्रसारमाध्यमांनी अधिक जबाबदारी
बिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी प्रसारमाध्यमांनी जबाबदारी ओळखणे तितकेच गरजेचे आहे. कारण प्रसारमाध्यामातून बिबट्याविषयी येणारे वृत्त हे अत्यंत भडक व अतिरंजीत स्वरुपात असतात. त्यामुळे जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी अधिक नकारात्मक भावना निर्माण होत असते. बिबट्याचा मुळ आधिवास नष्ट होणे व नागरी वस्तीत त्याचा शिरकाव यामागील कारणे शोधून बिबट्याबाबत बातम्या प्रसारमाध्यमांनी देण्याची गरज आहे, असे रंजीतजाधव म्हणाले.