उत्तर प्रदेशातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:11 AM2021-07-19T04:11:54+5:302021-07-19T04:11:54+5:30
याबाबत निफाड पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, दि १५ जुलै रोजी नांदुर्डी शिवारात ...
याबाबत निफाड पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, दि १५ जुलै रोजी नांदुर्डी शिवारात पालखेड डाव्या कालव्याच्या भरावात एका महिलेचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी याबाबत मृत महिलेचे फोटो प्रसार माध्यमात प्रसारित केल्यानंतर गुप्त माहिती मिळाली शिवाय मृत महिलेच्या मोबाइलच्या माहितीवरून संशयित गुन्हेगार निफाड तालुक्यातील रानवड येथे राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींचा शोध घेतला असून, या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या कबुलीत संशयित रवी अग्रवाल ( रा. दानकुया , पोस्ट तिल्लोरी, ता. बासी, जि. सिद्धार्थनगर , उत्तर प्रदेश) याने पोलिसांना घडलेला प्रकार कथन केला. गुन्ह्यातील संशयित आरोपी रवी अग्रवाल याचा भाऊ लाला उर्फ सुभाष अग्रवाल (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याचे या मृत महिलेशी प्रेम संबध होते. या दोघांनी लग्न केले तर समाजात बदनामी होईल म्हणून रवीची आई सवारीदेवी हिने लाला उर्फ सुभाष अग्रवाल व मयत महिला या दोघांना उत्तर प्रदेश येथून गोड बोलून रानवड, ता. निफाड येथे बोलावून घेतले. त्यात लाला उर्फ सुभाष अग्रवाल याला मोटारसायकल आणण्यासाठी पुणे येथे दि. १४ रोजी पाठवून दिले. त्याच रात्री सदर महिलेस गावात फिरून येऊ असे सांगत मोटारसायकलवर ट्रीपल सीट बसविले व रानवड कारखाना रोडने नेले. तिथे रवीने सदर महिलेचे पाठीमागून हात धरले तर सवारीदेवी हिने सदर महिलेचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रवी याचा मित्र मुमताज खान शमशुल्लाखान (रा. सिसवा, पोस्ट शहापूर, ता. डुमरियागंज, जि. सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) याच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह मोटारसायकलवर नेऊन नांदुर्डी शिवारात पालखेड डाव्या कालव्याच्या भरारावर टाकून दिला होता. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, सपोउनी व्ही. बी. निकम, सपोउनी शिवाजी माळी, पोलीस नाईक संदीप निचळ, पोलीस नाईक सागर घोलप, पोलीस कॉन्स्टेबल विलास बिडगर, पोलीस कॉन्स्टेबल मनोज आहेर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
इन्फो
संशयितास पोलीस कोठडी
निफाड पोलिसांनी दोन दिवस तपासाची चक्रे फिरवून संशयित रवी अग्रवाल, मुमताजखान शमशुल्लाखान या दोघांना अटक करून निफाड न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर तिसरी संशयित आरोपी सवारीदेवी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.