भगूरच्या दुकानफोडीचा उलगडा; चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:37 AM2019-06-18T00:37:47+5:302019-06-18T00:38:04+5:30
आठ महिन्यांपूर्वी भगूरच्या शिवाजी चौकातील जिजामाता संकुल येथील पूजा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर तोडून केलेल्या दुकानफोडीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, नाशिकरोड पोलिसांकडून सुरू असलेल्या एका तपासात संशयावरून ताब्यात घेतलेल्या चौघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
भगूर : आठ महिन्यांपूर्वी भगूरच्या शिवाजी चौकातील जिजामाता संकुल येथील पूजा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर तोडून केलेल्या दुकानफोडीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, नाशिकरोड पोलिसांकडून सुरू असलेल्या एका तपासात संशयावरून ताब्यात घेतलेल्या चौघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२२ आॅक्टोबर २०१८ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील किमती टीव्ही चोरून नेल्याची तक्रार दुकानाचे मालक सुमित दत्तात्रय चव्हाण यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला दिली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड येथील एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त खबरीच्या आधारे रेल्वे स्टेशनजवळ फिरणाऱ्या चौघा संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी भगूरच्या पूजा इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विशाल जयंती बुटिया (२२) रा. विदान्ता रो. हाऊस मखमलाबाद पंचवटी; रवी विठ्ठल घोडके (२५) रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद; अजय विठ्ठल घोडके (२०) रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद; सचिन प्रभाकर जाधव (२६) रा.भगूर या चौघांना अटक केली आहे.
मुद्देमाल जप्त
चोरट्यांकडून एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आहेत़ सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. शेळके, हवालदार प्रकाश भालेराव, समाधान वाजे, विशाल कुवर, राजेंद्र जाधव आदींनी पार पाडली.