जागतिकीकरणातही सफाई कामगारांचे शोषण : खैरालिया
By admin | Published: October 21, 2016 01:50 AM2016-10-21T01:50:18+5:302016-10-21T02:12:42+5:30
जागतिकीकरणातही सफाई कामगारांचे शोषण : खैरालिया
नाशिक : जागतिकीकरण झाल्यानंतरही सफाई कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे शोषण संपलेले नाही. कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्त करून आणि किमान वेतन न देता त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे मत सफाई कामगारांच्या जीवनाचे अभ्यासक जगदीश खैरालिया यांनी व्यक्त केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेंतर्गत स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने जगदीश खैरालिया यांचे व्याख्यान संपन्न झाले. हुतात्मा स्मारकात व्याख्यानमालेचे ३५ वे पुष्प त्यांनी ‘जागतिकीकरण आणि सफाई कामगारांची सद्यस्थिती’ या विषयावर गुंफले. व्यासपीठावर स्वातंत्र्य सैनिक पंडित येलमामे आणि वसंतराव हुदलीकर उपस्थित होते.
जागतिकीकरणाने अनेक परिमाणे बदलली आहेत. शेषाच्या फणावर उभी असलेली पृथ्वी अशा परंपरावादी विचारांना अण्णा भाऊ साठे यांनी फाटा देत पृथ्वीही श्रमिकांच्या हातावर उभी असल्याचे सांगितले होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या क्रांतीनंतर पृथ्वीही संगणकाच्या पडद्यावर असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व आभासी जग असून त्यावरच सध्या धोरणे ठरविली जात असल्याचे खैरालिया यांनी सांगितले. महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली अशा विविध राज्यांचा आणि ठाण्यातील चारशे सफाई कामगारांच्या कुटुंबीयांच्या केलेल्या अभ्यासाच्या आधारे निष्कर्ष मांडताना खैरालिया यांनी सफाईच्या कामात १० ते १२ टक्के ओबीसी सोडले तर बाकी दलित आहेत. तुंबलेल्या गटारींमध्ये त्यांनाच उतरावे लागते. याचे कारण ही जातीय रचनाच जोपासली जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तळातील सफाई कामगार काम करतो, मात्र त्याचे श्रेय संबंधित शहरांचे महापौर, शहराध्यक्ष घेत असतात. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी कारखान्यांमध्ये सफाई कामगार कंत्राटी असून, आवश्यकतेनुसार पदे भरली जात नाही. शासनाने किमान वेतन कायद्यात सुधारणा केल्यानंतर पंधरा हजार रुपये वेतनाऐवजी तीन ते आठ हजार रुपये दिले जातात, असेही ते म्हणाले.
यावेळी समाधान भारतीय यांनी परिचय करून दिला. पंडितराव येलमामे यांनी मनोगत व्यक्त केले, तर अशोक राबडे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)