घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, आठ जण भाजले; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:51 PM2021-04-03T13:51:02+5:302021-04-03T13:53:28+5:30
संजरीनगर : सिलेंडर बदलताना गळती होऊन घडली दुर्घटना
नाशिक : जुन्या नाशकातील वडाळानाका भागात असलेल्या संजरीनगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.2) रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैय्यद कुटुंबियांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस व अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलेंडर बसवित असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता सिलेंडरमधून गॅसची वेगाने गळती होऊ लागली यामुळे घरातील पुरुषांनी सिलेंडर पेटू नये म्हणून जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकले. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट झालाआणि फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरुन गेला.
आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तात्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. दोन बंबाच्या सहाय्याने सुदैवाने लवकर आग लवकर विझल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, पोलिसांकडून या दुर्घटनेच्या कारणांचा सुक्ष्म शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांनी घटनास्थळी न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही शनिवारी दुपारी पाचारण केले होते. या फ्लॅटमधून 3 रिकामे सिलेंडरदेखील आढळून आले आहे. या दुर्घटनेची नोंद मुंबईनाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भाजलेल्या जखमींची नावे अशी.....
सय्यद नुसरत रहीम (२५), ६३% जळीत
शोएब वलिऊल्ला अन्सारी(२८) ९० % जळीत
मुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५) ८५ % जळीत.
नसरीन नुसरद सय्यद (२५), ९५ % जळीत
सईदा शरफोद्दीन सय्यद( ४९), ९५ % जळीत
आरीफ सलिम अत्तार (५३) ०९ % जळीत
सय्यद लियाकत रहीम ( ३२) २७ % जळीत
रमजान वलिऊल्ला अन्सारी(२२), २७ % जळीत