कळवणला घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 01:34 AM2021-01-25T01:34:14+5:302021-01-25T01:34:35+5:30
शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने सुमारे १५ लाखांची वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
कळवण : शहरातील फुलाबाई चौकातील जिभाऊ ठाकरे यांच्या घरामध्ये रविवारी दुपारी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या घटनेत संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने सुमारे १५ लाखांची वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गॅस सिलिंडरचा स्फोट इतका जबरदस्त होता की घरावरील पत्रे उडाले. आगीने काही वेळेतच रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूचे नागरिक घरातून बाहेर पळाले. सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
सुमारे तीन तास आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनास्थळी कळवण नगरपंचायत, पोलीस स्टेशन, महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली.
राहुल पगार, चेतन पगार, प्रल्हाद शिवदे, बाळा निकम, टिनू पगार,राजेंद्र पगार,प्रदीप पगार, टग्या शेख, सचिन शिवदे, लौकिक शेख आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार, तहसीलदार बी. ए. कापसे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल यांनी भेट देऊन पाहणी केली.
स्फोटामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र या निमित्ताने कळवण शहरात अग्निशमन बंब व दलाची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. कळवण नगरपंचायतने अग्निशमन बंब शासनस्तरावर प्रस्ताव दाखल केला असून ९० लाख रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे कौतिक पगार यांनी सांगितले.