इंदिरानगरमध्ये पार्सल पॉइंट दुकानात गॅस गळतीमुळे स्फोट; दोन जण गंभीर जखमी

By अझहर शेख | Published: January 1, 2024 02:28 PM2024-01-01T14:28:20+5:302024-01-01T14:28:48+5:30

येथील कलानगर सिग्नलजवळ मैत्र विहार अपार्टमेंटच्या एका गाळ्यामध्ये वक्रतुंड पार्सल पॉइंट नावाचे दुकान आहे.

Explosion due to gas leak at parcel point shop in Indiranagar; Two people were seriously injured | इंदिरानगरमध्ये पार्सल पॉइंट दुकानात गॅस गळतीमुळे स्फोट; दोन जण गंभीर जखमी

इंदिरानगरमध्ये पार्सल पॉइंट दुकानात गॅस गळतीमुळे स्फोट; दोन जण गंभीर जखमी

संजय शहाणे,  नाशिक : येथील कलानगर सिग्नलजवळ मैत्र विहार अपार्टमेंटच्या एका गाळ्यामध्ये वक्रतुंड पार्सल पॉइंट नावाचे दुकान आहे. या दुकानात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून मध्यरात्रीनंतर गळती झाली. गाळ्यात गॅस साठून राहिलेला असताना सोमवारी (दि.१) सकाळी विक्रेत्याने दुकान उघडले अन् आवरासावर करत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी बटण दाबताच जाेरदार स्फोट झाला. या स्फोटात दुकानमालकासह एक रिक्षाचालक जखमी झाला आहे.

कलानगर परिसरातील वक्रतुंड पार्सल पॉइंट हे दुकान नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता दत्तात्रय लहामगे यांनी उघडले. विजेचे बटण दाबताच मोठा स्फोटाचा आवाज झाला. यामुळे लहामगे व त्यांच्यासोबत असलेला रिक्षाचालक सचिन हे दोघेही भाजलेल्या अवस्थेत बाहेर पळत आले. त्यांनी अंगावर पाणी टाकण्यास सांगितले असता आजूबाजूच्या विक्रेत्यांनी धाव घेत त्यांच्या अंगावर पाणी टाकले. त्यामुळे भाजलेल्या शरीराचा दाह अधिक होऊन वेदनांमध्ये वाढ झाल्याने त्यांना इंदिरानगर पोलिसांच्या मदतीने तत्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

घटनेची माहिती मिळताच माजी सभागृहनेता सतीश सोनवणे, नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, ॲड. अजिंक्य साने, आकाश खोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली. काही वेळाने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत दुकानात पाणी मारले. तसेच गॅस सिलिंडरची तपासणी केली. स्फोटाचा हादरा व आवाज इतका भीषण होता की संपूर्ण कलानगरचा परिसर हादरून गेला. दुकानात असलेल्या स्टेनलेस स्टीलच्या भरभक्कम ट्रॉलीचे काउंटर थेट मुख्य रस्त्यावर एखाद्या चेंडूप्रमाणे फेकलेे गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.वर्षाचा पहिला दिवस अन् सोमवार असल्याने चाकरमान्यांसह शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्यांची वर्दळ सकाळच्या सुमारास सुरू  होती.   बघ्यांनी याठिकाणी गर्दी केली होती.

Web Title: Explosion due to gas leak at parcel point shop in Indiranagar; Two people were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.