जिल्हा रुग्णालयाच्या सक्शन युनिटमध्ये स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 01:37 AM2021-05-24T01:37:21+5:302021-05-24T01:37:49+5:30
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्रणेतील बिघाड दुरुस्त केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशूंच्या स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट अर्थात चिमुकल्यांच्या अतिदक्षता विभागाशी संबंधित ही यंत्रणा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या काळजात धस्स झाले. त्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली. सक्शन यंत्राचे पाइप अचानक फुटल्याने मोठा आवाज झाला. तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. यावेळी जनरेटर रूमला कुलूप लावलेले होते आणि ज्या ठेकेदाराकडे याची जबाबदारी आहे, त्याने नेमलेले तंत्रज्ञ ही येथून गायब होते. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद येऊ लागले.
n घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश केला. यावेळी पाईप कपलिंगमधून तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आवाज झाला. जवानांनी तत्काळ हे फुटलेले पाईप बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात यश आले. यामुळे कक्षातील वैद्यकीय सेवेवर परिणाम झालेला नाही. सेवा सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या पाईपचा ऑक्सिजन पाईपलाईनशी संबंध नसल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.