कांद्यावरील निर्यातबंदी उठविणार - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:59 AM2019-10-10T00:59:33+5:302019-10-10T01:00:51+5:30
सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याचीही टीका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक झाल्याच्या दुसºयाच दिवशी आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यातबंदी उठवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत बोलताना दिली. याचवेळी विरोधकांवर टीका करताना त्यांनी आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचं आवतन असल्याचीही टीका केली.
येथील पाठक मैदानावर बुधवारी (दि.९) सायंकाळी बागलाण विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उमेदवार व माजी आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार उमाजी बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या २३ मिनिटांच्या भाषणात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा आलेख वाचून दाखवण्याबरोबरच कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा त्यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी सांगितले, आघाडीच्या जाहीरनाम्यात फक्त एकच गोष्ट राहून गेली ती म्हणजे प्रत्येक नागरिकाला एक ताजमहाल बांधून देऊ. पंधरा वर्षे खोटी
आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या, मात्र एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणारा
नार-पार प्रकल्प आगामी काळात भाजपला साथ दिल्यास येत्या पाच वर्षांत तोदेखील पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, बागलाणमधील सिंचनाचे प्रश्न, प्रत्येक नदीवर केटीवेअर बंधारे, प्रत्येक घराला नळाचे पाणी, प्रत्येक शेतशिवारात पाणी, वीज, आरोग्य, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून तालुका सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी दिलीप बोरसे यांच्या सारख्या हाडाच्या शेतकºयाला विधानसभेत पाठविण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले. डॉ. भामरे, दिलीप बोरसे, दादा जाधव, लालचंद सोनवणे, महेंद्र शर्मा, महेश देवरे, अण्णासाहेब सावंत, अरविंद सोनवणे, रासपचे महेंद्र अहिरे, साहेबराव सोनवणे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी कॉँग्रेसचे नगरसेवक पोपट अहिरे यांनी भाजपत प्रवेश केला.शरद पवार म्हणजे शोलेतील जेलरपंधरा वर्षांच्या आघाडीच्या काळात जेवढी कामे झाली नाही त्याच्या दुपटीने गेल्या पाच वर्षांत कामे झाली. हे जनतेने अनुभवले म्हणूनच जनताजनार्दनाने कॉँग्रेस-राष्ट्रवादीची वाईट अवस्था केली. आज शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.