एक लाख टन कांद्याची निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:06 PM2020-07-12T23:06:06+5:302020-07-13T00:18:42+5:30
मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला आतापर्यंत १.२६२ लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
लासलगाव : मागणी वाढल्याने मध्य रेल्वेकडून मालगाड्यांद्वारे बांगलादेशाला आतापर्यंत १.२६२ लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कोरोनासह गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील बळीराजासह निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेने मे, जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत ५५ मालगाड्यांद्वारे वाहतूक करून एक लाख टनाहून अधिक कांद्याची निर्यात केली आहे. रेल्वेसाठी ही मोठी कामगिरी मानली जात आहे. शेजारी देश असलेल्या बांगलादेशच्या आवश्यक गरजाही या निमित्त पूर्ण केल्या आहेत. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या विनंतीनुसार रेल्वेने बांगलादेशात कांद्याची निर्यात सुरू करण्यात आली आहे. मालवाहतुकीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांसमवेत आभासी (व्हर्च्युअल) बैठक आयोजित करत निर्यातीबाबत मार्गदर्शन केले आहे. मध्य रेल्वेवरील सर्व विभागीय स्तरावरसुद्धा अशाच बैठका घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात देशातच कांदा पाठविणे अवघड झालेले असताना व सर्व साधने ठप्प असताना थेट बांगलादेशात गेल्या कित्येक वर्षांत रेल्वेने महत्त्वाची भूमिका घेत कांदा रवाना केला आहे. त्याला प्रतिसाद मिळत असताना कांदा निर्यातीची पूर्तता करण्यासाठी स्थानकांवर व्यापारी मागणी नोंदवत आहेत. आतापर्यंत १.२६२ लाख टन कांदा भरलेल्या ५५ मालगाड्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवला स्थानकांमधून बांगलादेशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे पाठविण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने मालवाहतूक करणाºया संबधितांशी नियमतिपणे घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकांद्वारे बांगलादेशात कांद्याची निर्यात करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मालवाहतूकदारांना साहाय्य केले जात आहे. लोडिंगदरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टिन्संगसह निर्जंतुकीकरण व विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
लासलगाव ते बांगलादेश येथील दर्शना येथे दि. ६ मे २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या पहिल्या रॅकपासून निर्यातीला सुरु वात झाली.
मे महिन्यातच २७ मालगाड्यांद्वारे कांदा निर्यात करण्यात आली. जूनमध्ये २३, जुलैमध्ये आतापर्यंत ५ मालगाड्या बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत. ५५ पैकी १३ मालगाड्या मनमाडहून, निफाडहून ११, येवला येथून १०, खेरवाडी येथून ८, नाशिकहून ७, लासलगाव येथून ५ आणि कोपरगाव येथून एक रेल्वे अशा मालगाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.