सहप्रवासीचा बनाव करत लुटीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:26+5:302021-01-10T04:12:26+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षामधून प्रवासी वाहतुकीचा बनाव करत चोरट्यांची टोळी अन्य प्रवाशांना त्यांच्या रिक्षात बसवून त्यांच्याजवळील मौल्यवान ...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षामधून प्रवासी वाहतुकीचा बनाव करत चोरट्यांची टोळी अन्य प्रवाशांना त्यांच्या रिक्षात बसवून त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू लंपास करत होती. मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्यानंतर त्या रिक्षामधील अन्य बनावट प्रवासी रिक्षाचालकाला इशारा करत असे, यानंतर रिक्षाचालक त्याची रिक्षा थांबवून कधी प्रवाशाला इच्छित थांब्याअगोदरच उतरवून देत होता. या रिक्षामधील चोरट्यांच्या टोळीने शहर पोलिसांना आव्हान दिले होते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालत उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी या टोळीचा छडा लावण्याचे आदेश दिले. त्यांनी गुन्हे शाखांच्या सर्व युनिटला याबाबत ‘ॲक्टिव्ह’ केले.
दरम्यान, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई विशाल वाघ व अनिल शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरट्यांची टोळी त्र्यंबक रोडने उंटवाडी पुलाकडे जात असल्याचे समजतले. यानुसार त्यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना याबाबत कळविले. कोल्हे यांनी पथक तयार करून सापळा रचला. दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ वळणावर पोलिसांनी संशयित विनाक्रमांकाची रिक्षा रोखली. यावेळी रिक्षाचालकाने प्रवासी वाहतुकीचा बनाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र संशय बळावल्याने रिक्षाचालकासह चौघांना पोलिसांनी त्यांच्या वाहनात डांबले. त्यांना कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता संशयित रूपेश कैलास भागवत (२६, रा. खैरे गल्ली, भद्रकाली), मोईन मेहबूब शहा (२२, रा. घरकुल वसाहत, वडाळा), आरीफ सादिक शेख (३४, रा. नानावली), नवशाद नजाकत खान (२०, रा. समतानगर) यांनी त्यांनी सरकारवाडा व मुंबई नाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक तसेच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत याप्रकारे दोन प्रवाशांना लुटल्याची कबुली पोलिसांनी दिली.