एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजरला वावडे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:30+5:302021-09-02T04:31:30+5:30
मनमाड : कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी ...
मनमाड : कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी स्वस्तातील पॅसेंजर सेवा अजूनही सुरू करण्यात आली नसल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. एसटीच्या तुलनेत स्वस्त प्रवासाचे साधन म्हणून पॅसेंजर रेल्वेकडे पाहिले जाते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कमी खर्चात प्रवास सहज शक्य होत असल्याने पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मनमाड रेल्वेस्थानकावरून भुसावळ, मुंबई, पुणे, औरंगाबाद या चारही मार्गांवर पॅसेंजर सेवा सुरू होती. मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणारी मनमाड इगतपुरी शटल व मनमाड-पुणे पॅसेंजर या गाड्यांना स्थानिक प्रवाशांची अधिक पसंती होती. अनेक चाकरमानी या रेल्वेने नाशिक व पुण्याला जात असत. पॅसेंजर रेल्वेचे तिकीट अगदी अल्प असल्याने अनेक कष्टकरी प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतात.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असली तरी सर्वच गाड्या सुरू न करता काही विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. आता राज्यात जवळपास सर्वच बाबी अनलॉक झालेल्या आहेत. एसटी सेवाही पूर्ण क्षमतेने करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून तशी सेवा दैनंदिन सुरू आहे. असे असले तरी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर रेल्वे सेवा अजूनही सुरू झालेली नाही. रेल्वेची ही सेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
----------------------
# मनमाड रेल्वेस्थानकावरून यापूर्वी जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या #
* भुसावळ मुंबई पॅसेंजर
*भुसावळ देवळाली पॅसेंजर
*मुंबई भुसावळ पॅसेंजर
*देवळाली भुसावळ पॅसेंजर
*मनमाड इगतपुरी शटल
*मनमाड पुणे पॅसेंजर
*मनमाड सिकंदराबाद पॅसेंजर
----------------------
# पॅसेंजरसाठी थांबा असलेली लहान रेल्वेस्थानके #
ओढा
खेरवाडी
कसबे सुकेने
उगाव
समिट
पानेवाडी
हिसवळ
पांझन
पिंपरखेड
न्यायडोंगरी
-----------------
मनमाड रेल्वेस्थानकावरून यापूर्वी जात असलेल्या सर्व पॅसेंजर गाड्या सध्या बंद आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास तशी सूचना प्रवाशांना देण्यात येईल.
- बी. एल. मीना, वाणिज्य निरीक्षक, मनमाड
---------------------------
लॉकडाऊननंतर सर्व जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मेल-एक्सप्रेस गाड्या सुरू असताना पॅसेंजर गाड्या बंद ठेवून रेल्वे प्रशासन सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहे.
- बाबुराव निकम, प्रवासी
----------------------
पॅसेंजर गाड्या बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाची गैरसोय झाली असून मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. लवकरात लवकर पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा.
- सचिन शिरापुरे, प्रवासी