राष्ट्रपतींकडून दुष्काळावर चिंता व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:44 AM2018-10-23T01:44:48+5:302018-10-23T01:45:20+5:30
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ऋषभदेवपुरम (मांगीतुंगी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्र मी १०८ फूट उंच मूर्तीच्या निर्माण समितीतर्फे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन सोमवारी (दि. २२) राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. आपण कझाकीस्तानमध्ये दौऱ्यावर गेलो असता तेथेही दुष्काळी परिस्थिती होती असे तेथील राष्ट्रपतींनी आपल्याला सांगितले होते. आपल्या आगमनावेळी तेथे पाऊस झाला होता, असे सांगून राष्ट्रपती कोविंद यांनी राज्यातील दुष्काळाबाबत आपण चिंतित असल्याचे यावेळी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या मुद्द्याला अनुसरून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस वीज बील माफी सारख्या ९ प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. निसर्गातील वाढत्या असमतोलाकडे लक्ष वेधताना त्यांनी निसर्गाशी छेडछाड करणे बंद न केल्यास मानव जातीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करून निसर्गासोबत सहजीवन व सहिष्णूतेने व्यवहार ठेवावा लागण्याची गरजही व्यक्त केली.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रपतींच्या पत्नी सौ. सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागरराव, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, गणीनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी, पीठाधिश स्वामी रविंद्र कीर्ती, वाशीम येथील आमदार राजेन पाटनी आदी मान्यवर उपस्थित होते.