माकपाच्या दोन सदस्यांची हकालपट्टी
By Admin | Published: March 23, 2017 02:50 AM2017-03-23T02:50:09+5:302017-03-23T02:50:09+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका तटस्थ राहण्याची असताना
नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका तटस्थ राहण्याची असताना शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांना मतदान करीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने बुधवारी पक्षाने जिल्हा परिषद सदस्य अनिता गोरख बोडके व ज्योती गणेश जाधव यांची हकालपट्टी केली.
तटस्थ राहण्याबाबत आम्हाला कोणताही व्हीप बजावण्यात आला नसल्याचे अनिता गोरख बोडके यांनी सांगितले आहे. माकपाचे जिल्हा सचिव सुनील मालसुरे यांनी बुधवारी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करीत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची सूचना केल्याचे म्हटले आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना व काँग्रेसला मतदान करणाऱ्या अनिता बोडके व ज्योती जाधव यांची हकालपट्टी केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)