आरटीईसाठी ३० पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:04 AM2019-03-23T01:04:22+5:302019-03-23T01:04:52+5:30
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली
नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी निर्धारित वयोमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत सुमारे १२ हजार ७०८ अर्ज संकेतस्थळावर दाखल करण्यात झाले आहेत. वयोमर्यादेत वाढ झाल्यामुळे आता प्रवेशअर्ज दाखल करणाऱ्या पालकांचा ओघही वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रियेत मोफत प्रवेश मिळण्यासाठी जिल्हाभरातून १२ हजार ७०८ अर्ज दाखल झाले असून, यात १२ हजार ६७२ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज आॅनलाइन पोर्टलच्या साह्याने, तर ३६ पालकांनी मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून दाखल केले आहेत. जिल्ह्यात यावर्षी ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरवातीला २२ मार्चपर्यंत होती. मात्र शिक्षण विभागाने त्यात आठ दिवसांची वाढ करून ती आता ३० मार्चपर्यंत केली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया यंदा तब्बल दोन महिने उशिराने म्हणजे ५ मार्चला सुरू झाली. दरम्यान, शिक्षण विभागाने पहिलीच्या प्रवेशासंबंधी वयोमर्यादेत बदल केला आहे. त्यामुळे पूर्वीच्या वयोगटापेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. परंतु, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पालक अर्ज दाखल करू शकलेले नाहीत.
मुदतवाढ झाल्याने अनेकांना लाभ
आरटीईअंतर्गत पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या पाल्याचे वय ६ वर्षे ११ महिने २९ दिवस पूर्ण अशी अट होती. त्यामुळे ७ वर्षे वयाच्या मुलांना पहिलीत प्रवेश घेणे कठीण झाले होते. आता ही मर्यादा ७ वर्षे २ महिने २९ दिवस करण्यात आल्याने अनेकांना याचा लाभ होणार आहे. बहुतांशी इंग्रजी शाळांनी पहिली प्रवेशाचे वय ७ वर्षे केल्याने शासनाने असा बदल केला आहे.