पंचायत महिला शक्ती अभियानाच्या कार्यकारिणीस मुदतवाढ
By admin | Published: October 27, 2014 11:58 PM2014-10-27T23:58:10+5:302014-10-28T00:23:33+5:30
डिसेंबर २०१५ पर्यंत लोकप्रतिनिधींची पदे कायम राहणार
नाशिक : पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला लोेकप्रतिनिधींच्या कार्यकारिणीच्या संघास डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तसे आदेश जिल्हा परिषदांना दिले आहेत.
या वर्षाच्या १० सप्टेंबर २०१४ रोजी या महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणीच्या संघाची मुदत संपुष्टात आली होती. ‘पंचायत महिला शक्ती अभियान’ अंतर्गत ६ नोव्हेंबर २०१२ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासननिर्णयाद्वारे १८ महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणी संघाची स्थापना करण्यात आली होती. या कार्यकारिणीचा कालावधी दोन वर्षांचा असून, त्याची मुदत १० सप्टेंबर २०१४ रोजी संपली होती. पंचायत महिला अभियानांतर्गत लोकनियुक्त पंचायत राज संस्थांमधील १८ महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणी संघाच्या शासननिर्णय २९ एप्रिल २०१० च्या धोरणानुसार व ६ नोव्हेंबर २०१२ च्या शासननिर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार दर दोन वर्षांनी निवड होणे आवश्यक आहे.
तथापि, सदर निवडप्रक्रियेच्या काळात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने ‘पंचायत महिला शक्ती अभियान’ अंतर्गत लोकप्रनियुक्त १८ महिला लोकप्रतिनिधी कार्यकारिणी संघाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता नवीन शासननिर्णयानुसार या महिला लोकप्रतिनिधींच्या कार्यकारिणीच्या संघास डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)