कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्यावी
By Admin | Published: December 27, 2016 11:24 PM2016-12-27T23:24:10+5:302016-12-27T23:24:41+5:30
केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे : महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने घेतली भेट
लोहोणेर : कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व निर्यातदारांच्या शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत बोलताना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व निर्यातदारांची समस्या विशद करताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, यावर्षी राज्यातील कांदा उत्पादन हे दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होणे अपेक्षित आहे. हे उत्पन्न चांगल्या हंगामाच्या सरासरी १.७५ लक्ष मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या शेजारील तसेच इतर राज्यांतही चांगल्या हवामानामुळे कांद्याचे जास्त उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादन किफायतशीर होण्यासाठी व किंमत स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यात होणे अत्यंत आवश्यक आहे. इतर कांदा उत्पादक व निर्यातदार देशांमध्येही यावर्षी कांद्याचे जास्त उत्पन्न झाले असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. या योजनेस ३१ डिसेंबर २०१६ नंतर मुदतवाढ न दिल्यास महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व निर्यातदार शेतकऱ्यांची कांदा निर्यातीची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे व त्यांना इतर देशातील बाजार उपलब्ध होणे व निर्यात करणे यावर बंधने येणार आहेत. त्यामुळे निर्यात कमी होऊन राज्यात व देशात कांदा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध होऊन कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता व परिणामी कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)